कोल्हापूर - ज्योतिबा दर्शनाहून परत येत असताना ट्रॅक्टर ट्रॉली उलटून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (दि. 13 मार्च) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. ज्योतीबाचे दर्शन घेऊन येथील सदळे-मादळेमार्गे गावी परत जात असताना ही दुर्घटना घडली. अशोक शंकर गावडे ( वय 56 वर्षे), असे यातील मृत व्यक्तीचे नाव आहे.
ऊस गळीत हंगाम संपल्याने जोतिबा दर्शनासाठी -मिळालेल्या माहितीनुसार, वारणा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यानंतर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील 20 ते 25 ऊसतोड मजूर ट्रॅक्टर ट्रॉलीमधून ज्योतिबा दर्शनासाठी गेले होते. ज्योतीबाचे दर्शन घेऊन सर्वजण घरी परतत असताना येथील सादळे-मादळे घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. यातील काहींना येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.