कोल्हापूर :अंबाबाई मंदिरात510 किलो वजनाच्या दरवाजाला बिजागरी नसून लाकडी व लोखंडी खुंटीनेच हा दरवाजा मंदिराच्या मूळ बांधकामामध्ये बसवला गेला होता. वारंवारच्या घर्षणामुळे या खुंट्या झिजून तसेच लाकडाच्या आयुर्मानामुळे हा दरवाजा हळूहळू खराब होऊ लागला होता. काल ( गुरूवारी दि. 2 फेब्रुवारी ) रोजी हा जुना दरवाजा बदलून त्या ठिकाणी सुंदर असा सागवानी लाकडाने तयार केलेला नवा दरवाजा बसवण्यात आला. जुन्या दरवाजापेक्षा वजनाने थोडा हलका परंतु ताकतीने तितकाच भक्कम असा हा दरवाजा कालपासून आई अंबाबाईच्या सेवेत रुजू झाला.
अशी आहे मंदिरातील रचना :करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर म्हणजे प्राचीन शिल्प वैभवाचा एक उत्तम नमुना आहे. या मंदिराला अनेक रचना वैशिष्ट्य आहेत. या मंदिरातला पहिला मंडप म्हणजे मुख मंडप अर्थात गणेश मंडप आहे. या मंडपाला पूर्वी पश्चिमेकडूनही रस्ता होता. मात्र गरुड मंडपाच्या उभारणीनंतर हा पश्चिमेचा दरवाजा बंद होऊन फक्त उत्तर आणि दक्षिणेहून रस्ता सुरू राहिला. त्यानंतर येतो तो मध्यमंडप, याचा पश्चिमेचा रस्ता गणेश मंडपाकडे जातो. उत्तरेचा महाकालीकडे तर दक्षिणेचा महा सरस्वतीकडे जातो. या मंडपाला लागून पूर्वेला एक पितळेने मढवलेला भव्य उंबरा आहे. त्याला एक भव्य लाकडी दरवाजा देखील आहे. हा उंबरा अर्थातच पितळी उंबरा उघडतो तो अंतराळ मंडपात. अंतराळ मंडप ही मंदिर शास्त्राची एक सुंदर संकल्पना आहे. मुख्य मंडप अथवा मध्यमंडप या दोन्ही ठिकाणाहून देवतेचे दर्शन घडते. मात्र इथे अनेक व्यवधाने आहेत. ज्याला एकाग्र होऊन देवदर्शनासाठी जायचे आहे अशा भक्ताला जगापासून दूर नेऊन देवतेशी जोडणारा मंडप म्हणजे अंतराळ असल्याचे मंदिर अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी म्हंटले आहे.