कोल्हापूर - गेल्या चार वर्षांपासून कोल्हापूरातील 500 पेक्षा अधिक तरुण एकत्र येत कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करत आहेत. 'नो शेव्ह नोव्हेंबर' असे त्यांच्या मोहिमेचे नाव आहे. कोल्हापुरात ही मोहीम चांगलीच चर्चेत आहे. दरवर्षी एक महिना दाढी न करता त्यावर होणारा खर्च वाचवून मदत म्हणून कॅन्सरग्रस्त रुग्णांना देतात अशी ही मोहीम आहे. (No Shave Novembe Campaign in Kolhapur) याबाबत ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.
काय आहे कोल्हापूरातील 'नो शेव्ह नोव्हेंबर' मोहीम ?
जगभरात नोव्हेंबर महिन्यात 'नो शेव्ह नोव्हेंबर' ही मोहीम सुरू असते. याच मोहिमेचे कोल्हापुरातील तरुणांनी अनुकरण करायचे ठरवले आहे. त्यानुसार त्यांनी व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून युवकांना जोडण्याचे काम सुरू केले आहे. त्यांच्या या मोहिमेला आजपर्यंत कोल्हापुरातील 500 पेक्षा अधिक तरुणांनी पाठिंबा दिला आहे. (No Shave Novembe Cancer Campaign in Kolhapur) याअंतर्गत दरवर्षी एक महिना दाढी न करता त्याला जेव्हढे पैसे खर्च होतात ते वाचवून ती रक्कम कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारासाठी द्यायची या उद्देशाने ही मोहीम हाती घेतली आहे.
सुरुवातीला या मोहिमेबद्दल माहिती मिळाल्यानंतर शेखर पाटील आणि दर्शन शहा यांनी हा विचार त्याच्या मित्रमंडळींना बोलून दाखवला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कर्करोगाचे हजारो रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी आपण ही मोहीम सुरू करू असा निर्णय सर्वांनी केला. त्यानुसार सलग चार वर्षे ही मोहीम अगदी उत्साहाने राबवण्यात येत आहे. दरवर्षी याला प्रतिसाद वाढतच असून अनेक रुग्णांना यामुळे आर्थिक मदत केली जात आहे.
विविध क्षेत्रातील युवक, पोलीस, वकिल, डॉक्टर,शिक्षक आदी मोहिमेत सहभागी:
या मोहिमेबाबत समजताच अनेकांकडून याचे कौतुक झाले. यामध्ये हळूहळू अनेक जण जोडले गेले. यामध्ये अनेक क्षेत्रातील युवक सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांपासून वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, सीए, पत्रकार, राजकीय व्यक्ती तसेच सामाजिक कार्यकर्तेही यामध्ये जोडले गेले आहेत. हे सर्व लोक युवकांसोबतच आपल्या परीने दाढीवर होणारा एक महिन्याचा खर्च वाचवून मोहिमेला देत आहेत. गतवर्षीच्या मोहिमेत स्वतः समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनीही सहभाग नोंदवला आहे. तसेच, मोहिमेला आर्थिक मदत केली. त्यांच्याच हस्ते जवळपास 5 रुग्णांच्या नातेवाईकांना मदत देण्यात आली आहे.