कोल्हापूर - जिल्ह्यातील सर्वच धरणांची चांगल्या पद्धतीने देखभाल करण्यात येत आहे. कोणत्याही धरणाला धोका नसून सर्वच सुरक्षित आहेत. शिवाय सर्वच धरणांमध्ये शंभर टक्के पाणी साठा होऊन जिल्ह्याला योग्य पद्धतीने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदीवडेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. शिवाय सर्वच प्रकल्पांची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती केली जात असल्याने जिल्ह्याला योग्य आणि मुबलक पाणी मिळते, असेही बांदीवडेकर यांनी म्हटले. कशा पद्धतीने कोल्हापुरात प्रकल्पांची काळणी घेतली जाते? कसा खर्च केला जातो? याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने...
जिल्ह्यात 'इतके' आहेत महत्वाचे प्रकल्प
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 4 मोठे प्रकल्प आहेत. त्यामध्ये वारणा, राधानगरी, दुधगंगा आणि तुळशी यांचा समावेश आहे. त्याच्यापाठोपाठ 9 मध्यम प्रकल्प आहेत आणि एकूण 54 लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. जिल्ह्यात येथील मोठ्याप्रमाणात असलेल्या प्रकल्पांमुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. जवळपास 96 टीएमसी पाण्याचा साठा पावसाळ्या अखेर होत असतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्हा सुजलाम सुफलाम झाला आहे.
कशा पद्धतीने घेतली जाते देखभाल ?
जिल्ह्यात जवळपास 96 टीएमसी पाणीसाठा दरवर्षी पावसाळ्याच्या शेवटी होत असतो. त्याचाच जिल्ह्यातील शेतीसाठी तसेच कारखाने आणि पिण्यासाठी पुरवठा केला जातो. याच विभागामार्फत याची पाणीपट्टीच्या स्वरूपात रक्कम वसुली केली जाते तीच रक्कम या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च केली जाते. कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने उत्तर आणि दक्षिण असे दोन विभाग पडले आहेत. याच दोन विभागामार्फत सर्व देखभाल केली जाते अशी माहितीही यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदीवडेकर यांनी दिली. ते पुढे म्हणाले, संचनाच्या माध्यमातून जे पैसे शासनाला जमा होतात त्यातील 20 टक्के जर लोकल टॅक्स वगळला तर 80 टक्के पैसे हे केवळ देखभाल दुरुस्तीसाठी मिळत असतात. त्याचपद्धतीने इंडस्ट्री आणि पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून शासनाकडे जे पैसे जमा होतात त्यातील 40 टक्के रक्कम देखभाल दुरूस्तीसाठी मिळत असते. यातून सर्वच देखभाल दुरूस्थितीची कामे होतात असे नाही काही वेळा शासनाकडून विविध मार्गाने यासाठी निधी मंजूर करून घेतला जातो, अशी माहिती सुद्धा बांदीवडेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
'प्री मान्सून' आणि 'पोस्ट मान्सून' अशा दोन महत्वाच्या तपासण्या होतात
दरवर्षी पाटबंधारे विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत 'प्री मान्सून' आणि 'पोस्ट मान्सून' अशा दोन महत्वाच्या तपासण्या होत असतात. त्यामध्ये धरणाला कोणत्याही पद्धतीने काही लिकेज आहे किंव्हा काही डागडुजीची गरज असल्यास तात्काळ त्याठिकाणी डागडुजी केली जाते. काही धरणांची तपासणी ही 'डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशन नाशिक' यांच्यामार्फत केली जाते.
यांत्रिकी स्वरूपाची मोठ्या प्रमाणात कामे होतात