कोल्हापूर - सरासरीपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांना गृह विलगीकरणाऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत काल (26 मे) माहिती दिली. या 18 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सध्याच्या घडीला एकूण कोविड सेंटर, कशा पद्धतीने रुग्णांना सुविधा उपलब्ध आहेत, जिल्ह्यातली उपचार व्यवस्था आणि उपलब्ध बेडबाबतचा ईटीव्ही भारतने विशेष आढावा घेतला आहे.
जिल्ह्यात 83 कोविड केअर सेंटर
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा प्रभाव जास्त दिसून येत आहे. आजपर्यंत एकूण 1 लाखांपेक्षाही अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 85 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 3 हजार 500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सुमारे 13 हजार 500 रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात पहिल्या लाटेच्या वेळेस 2396 ऑक्सिजन, 350 आयसीयू तर 140 व्हेंटीलेटर बेड उपलब्ध होते. मात्र, दुसऱ्या लाटेत प्रशासनाने 3174 ऑक्सिजन, 648 आयसीयू तर 300 व्हेंटीलेटर बेड उपलब्ध केले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यातील 17 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 21 ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालये, त्याचबरोबर सर्व कोविड सेंटरवर आरटीपीसीआर टेस्टची सोय केली आहे. सध्या जिल्ह्यात 83 कोविड केअर सेंटर आहेत. त्यामुळे रुग्णांवर त्वरीत उपचार होत आहेत. यामध्ये एकट्या कोल्हापूर शहरात 15 कोविड सेंटर उभे करण्यात आले आहेत. त्यामध्ये 1089 नॉन ऑक्सिजन बेड, 285 ऑक्सिजन बेड आणि 11 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत.
सर्वच कोविड केंद्रात योग्य सुविधा
ज्यांना कमी प्रमाणात लक्षणे आहेत आणि त्यांच्या घरी विलगीकरणाची सोय नाही. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोविड केअर केंद्र उभारण्यात आली आहेत. सर्वच ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. अनेकजण कोणतीही मोठी आर्थिक पार्श्वभूमी नसताना कोविड सेंटरच्या माध्यमातून सेवा देत आहेत. प्रामुख्याने अनेक गावात लोकसहभागातून कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. सायबर कॉलेज येथे व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे 180 बेडचे कोविड सेंटर, व्हाईट आर्मीचे 100 बेडचे कोविड सेंटर आहे. पांचगाव गिरगाव मेन रोड शेजारी असलेल्या राजर्षी शाहू आश्रमशाळेत संभाजी ब्रिगेडनेही कोविड सेंटर सुरू केले आहे. जिल्ह्यात अशाच पद्धतीने अनेकांनी प्रशासनास मदत केली आहे. या सर्वच ठिकाणी रुग्णांची योग्य काळजी घेतली जात आहे. शिवाय जेवणाचीही व्यवस्था चांगल्या पद्धतीने करण्यात आली आहे. सर्वात विशेष म्हणजे रुग्णांना करमणूक आणि मनावरील ताण कमी करण्यासाठी सर्वच कोविड सेंटरमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. योगासनेही घेतली जात आहेत.
ग्रामपंचायतींनाही विलीगीकरण केंद्र उभारण्यास परवानगी
ग्रामपंचायतींनाही आता 20 किंवा त्यापेक्षा जादा बेडचे विलगीकरण केंद्र उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे. याआधी विलगीकरणासाठी ग्रामपंचायतींना अनेक अडचणी येत होत्या. त्याचा विचार करून 15 व्या वित्त आयोगातून 25 टक्क्यांच्या मर्यादेत खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायती आता स्वतःहून याबाबत विचारणा करून विलगीकरण केंद्र सुरू करत आहेत.