कोल्हापूर - प्रत्येकालाच वाटत आपले लग्न अगदी वाजत गाजत व्हावे असे वाटते. मग त्यासाठी ढोल ताशा, संबळ, सनई-चौघडे पासून हलगीपर्यंत सगळे वाजंत्री शोधून-शोधून लग्नाची शोभा वाढवली जाते. मात्र ज्यांच्यामुळे प्रत्येक लग्नाची शोभा वाढते त्या वाजंत्र्यांना साधे जेवेलात का? म्हणून सुद्धा कोणी विचारत नाही. मात्र कोल्हापुरातल्या एका लग्नसमारंभामध्ये या परंपरेला फाटा देणारा प्रसंग समोर आला आहे, ज्यामुळं काही लोकं खरंच जगावेगळी असतात याची जाणीव होते.
कोल्हापुरातल्या गडहिंग्लज येथे तीन दिवसांपूर्वी भैरूंना काळू पाटील यांच्या मुलाचे म्हणजेच चेतन पाटील यांचे लग्न होते. लग्नात डॉल्बीला फाटा देत त्यांनी पारंपरिक वाद्य वाजावणाऱ्या वाजंत्र्यांना सुपारी दिली होती. या वाजत्रीच्या सुरात लग्न समारंभ अगदी थाटात पार पडला होता. त्यानंतर पै-पाहुण्यांची वधूवरांसोबत आपले फोटो काढून घेण्यासाठी धडपड सुरू झाली. मात्र, पै-पाहुन्यांच्या या घोळक्यातूनच नवरदेवाचे वडील भैरूंना पाटील हे वाजंत्र्यांना थेट घेऊन स्टेजवर आले. दोन मिनिटे कोणालाही काही समजले नाही.
भैरुंना पाटील यांनी स्टेजवर येताच समोरच्या फोटोग्राफरला सांगितले यांचा सुद्धा फोटो घ्या. फोटोग्राफरला देखील हा प्रकार पाहून पाटलाच्या कृतीचा अभिमान वाटला. एखाद्या लग्नाची शोभा वाढविण्याचे काम जे वाजंत्री नेहमीच करत आले आहेत. त्यांना लग्न समारंभ पार पडल्यानंतर ठरलेल्या सुपारीचे पैसे देऊन त्यांना पाठवले जाते. मात्र गडहिंग्लजच्या या लग्नात या वाजंत्र्यांना आलेला अनुभव सर्वांपेक्षा वेगळा असाच होता.