कोल्हापूर : इचलकरंजी येथे राहणारे कृष्णा इंगळे हे गेल्या काही वर्षांपासून जलपर्णीचा विळख्यात अडकलेल्या पंचगंगा नदीला प्रदूषणमुक्त आणि जलपर्णीमुक्त करण्यासाठी माणुसकी फौंडेशन मार्फत काम करत आहेत. गेले 50 पेक्षा जास्त दिवस माणुसकी फौंडेशनची टीम पंचगंगा नदीला जलपर्णी मुक्त करण्यासाठी झटत आहेत. दरम्यान याच वेळी कृष्णा इंगळे यांचा विवाह शिवानी सोबत निश्चित झाला आणि 13 जून रोजी विवाह संपन्न झाला. मात्र लग्नाआधीच्या विधीमुळे त्यांना 10 जून पासूनच जलपर्णी मुक्तीच्या मोहिमेसाठी जाता आले नाही. यामुळे आपली पंचगंगा पूर्ण जलपर्णीमुक्त झाली नाही. मागील 3 दिवस आपल्याला जात आले नाही याची हुरहुर कृष्णा यांच्या मनाला लागून राहिली होती.
कृष्णा यांचा निश्चय:कृष्णा इंगळे यांनी मनात निश्चित केले की, लग्न झाल्या झाल्या सर्वप्रथम पंचगंगा नदीवर जाऊन खारीचा वाटा म्हणून आपल्या नववधूसह शक्य होईल तेवढी जलपर्णी काढायची. त्यानुसार मंगळवारी 13 जून रोजी विवाह संपन्न होताच इचलकरंजी येथील वरदविनायक गणपती मंदिर येथे गणरायाचं आशिर्वाद घेऊन नववधू शिवानीला आपला मानस त्यांनी सांगितला. यानंतर नववधू शिवानी आणि कृष्णा हे दोघेही काल पंचगंगा नदीपात्र येथे येऊन जलपर्णी काढत पंचगंगा प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला. कृष्णा व शिवानी यांच्या या उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत.