कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली होती. त्यांच्या मागणीबद्दल आदर करतो. पण, त्यांनी नामविस्ताराची आपली मागणी मागे घावी, अशी विनंती ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केली आहे. तसेच शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा आणून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा -श्रीमंत पेशव्यांचे दहावे वंशज राहायचे भाड्याच्या घरात, म्हणाले इतिहासाशी छेडछाड नको
नामविस्तार हा हेतू असला, तर शिवाजी हे नाव गायब होईल, अशी भीतीसुद्धा एन. डी. पाटील यांनी व्यक्त केली. ४ दिवसांपूर्वी राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या नावात दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असे नामकरण करण्याची मागणी नूतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी केली होती. शिवाय ज्या ज्या सार्वजनिक ठिकाणी फक्त शिवाजी असा उल्लेख आहे, त्या ठिकाणांचासुद्धा नामविस्तार करण्याची मागणी त्यांनी केली होती.
याबाबत एन. डी. पाटील यांनी आक्षेप नोंदवला असून 55 वर्षांनंतर आता विद्यापीठाचे नाव बदलण्याचा मुद्दा समोर आणून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. शिवाजी महाराजांचे नाव अजरामर व्हावे यासाठी सूचना करत आहेत. त्यांच्या सूचनेचा आदर करतो. मात्र, प्रत्येक प्रश्नाला दुसरी बाजू सुद्धा असते, ती समजून घेणे गरजेचे असल्याचेसुद्धा एन. डी. पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता संभाजीराजे याबाबत काय मत मांडतात? हे पाहावे लागणार आहे.