कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गेली दीड दशक मित्र असलेले, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात राज्यामध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीमधील फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील एक गट थेट सत्तेत सहभागी झाला. अजित पवार यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतलेले मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे मित्र रहावेत, यासाठी आपण त्यांना खासगीत आमच्या सोबत येण्याचा सल्ला दिला आहे. असे वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून दिली.
मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होणार: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दिल्लीवारी करून आलेले मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले की, थोड्याच वेळात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. तसेच खाते वाटपाची यादी जाहीर झाल्यावर कोणते खाते कोणाकडे कळेल. भाजप आणि शिंदे गटात काय अडले आहे माहीत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणते खाते येईल हे तेंव्हाच समजेल. मात्र शिंदे फडणवीस पवार सरकारमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचे मुश्रीफ म्हणाले.