कोल्हापूर - या देशात राजे अनेक झाले, पण ज्यावेळी समाजाचे सत्व गेले होते, त्यावेळी समाजाला संघटीत करण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शाहू महाराजांनी सत्ता ही उपेक्षित घटकांसाठी वापरली. त्यांनी शिक्षण शेती, मल्लविद्या, उद्योग, व्यापार याचा व्यापक विचार केला होता. तसेच एका ठिकाणी महाराजांनी त्यांच्यापेक्षा मोठ्या पैलवानाशी कुस्ती जिंकून, कुस्ती ही शक्तीने नाहीतर युक्तीने जिंकता येते हे दाखवून दिल्याचे पवार म्हणाले. शाहू महाराजांचे हे स्मारक नव्या पिढीला आधुनिकतेचा व समतेचा विचार देईल, असेही पवार म्हणाले.
शरद पवारांच्या हस्ते आज कोल्हापूरमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचं लोकार्पण झाले. यावेळी व्यासपीठावर छत्रपती शाहू महाजार, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, इतिहासतज्ज्ञ जयसिंग पवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होते.