कोल्हापूर : तेलंगाणाच्या भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्रात पक्ष वाढीसाठी चाचपणी सुरू आहे. आता बीआरएस भाजपाची 'बी' टीम आहे असे हिणवणारे शरद पवार यांची राष्ट्रवादीचं भाजपसोबत गेली, असा हल्लाबोल भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला. के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते.
'काँग्रेसही फुटण्याच्या मार्गावर' : महाराष्ट्रात शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, आता काँग्रेसही फुटण्याच्या मार्गावर आहे. आम्ही महाराष्ट्रातून सुरुवात जरी केली असली तरी शेतकरी, दलित आणि तरुणांसाठी आमचं काम असणार आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचा मुद्दा गंभीर असून शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत हे सरकार उदासीन असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
'सरकारला शेतकऱ्यांबाबत दया नाही' : तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवा, अशा सूचना भारत राष्ट्र समितीकडून राज्य सरकारला करण्यात आल्या होत्या. मात्र या सरकारला शेतकऱ्यांबाबत कोणतीही दया नाही. महाराष्ट्रातीलच एका अधिकाऱ्याने एक लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत असल्याचा अहवाल दिला. याकडेही राज्य सरकारने दुर्लक्ष केले, अशी जळजळीत टीका केसीआर यांनी केली आहे.