कोल्हापूर Napkin Bouquet : कोणत्याही शुभकार्यप्रसंगी येणारे पाहुणे हमखास नैसर्गिक किंवा कृत्रिम फुलांनी बनवलेले बुके घेऊन येतात. मात्र, कालांतरानं या बुकेतील नैसर्गिक फुलं कोमेजून जातात. तसंच कृत्रिम फुलांचाही म्हणावा तसा पुनर्वापर होत नाही. परिणामी या वस्तू टाकाऊ बनतात. यावरच कोल्हापूरच्या तरुणानं उपाय शोधलाय. या तरुणानं चक्क नॅपकिनपासून बुके बनवून शुभ कार्यानंतर या नॅपकिनचा वापर करता येईल अशा पद्धतीनं नॅपकिन बुके डिझाईन करण्यात आलाय. सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या आणि लग्न सराईच्या काळात या नॅपकिनबुकेला मागणी वाढली आहे. कोल्हापुरातील 'अर्धा शिवाजी पुतळा' येथील सुनील खोले आणि निलेश खोले या बाप लेकांचं 'नॅपकिन बुके' दुकान ग्राहकांची गर्दी खेचतंय.
शुभकार्यात शुभेच्छा देण्यासाठी नवीन पद्धत : मूळचे करवीर तालुक्यातील सांगरुळ गावचे सुनील खोले आणि निलेश खोले या बापलेकांनी शुभकार्यात शुभेच्छा देण्याची नवीन पद्धत कोल्हापूरकरांसाठी आणलीय. सांगरुळच्या बाजारवाडा इथं या दोघांनी स्वतः 'नॅपकिन बुके' बनवून विकायला सुरुवात केली. नंतर त्यांनी कोल्हापूर शहरातही एक दुकान सुरू केलं. त्यांच्याकडे मिळणाऱ्या 'नॅपकीन बुके'चं इतर ठिकाणी मिळणाऱ्या नॅपकिन बुकेपेक्षा वेगळेपण असल्यामुळं या ठिकाणी अनेक ग्राहक आवर्जून येत असल्याचं निलेश खोले यांनी सांगितलंय.
काय आहे नॅपकिन बुकेचं वैशिष्ट्य : निलेश आणि त्यांचे वडील सुनिल यांनी आपल्या दुकानात मिळणाऱ्या 'नॅपकिन बुके'चं वेगळेपण सिद्ध करुन ते टिकवण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार त्यांनी स्वतःच नॅपकिन बुके बनवायला सुरुवात केली. इतर ठिकाणी मिळणाऱ्या नॅपकिन बुकेमधील रचना ही काही वेळातच बिघडते. मात्र निलेश यांनी त्यावर उपाय शोधून योग्य प्रकारे नॅपकीन बुके बनवायला सुरुवात केली. त्यामुळं निलेश यांनी बनवलेले नॅपकिन बुके लोकांना आवडू लागले. त्याचबरोबर निलेश हे हवं तसं नॅपकिन बुके बनवून देतात. यामध्ये प्रत्येक नॅपकीनवर लोगो किंवा कंपनीचं नाव देखील प्रिंट/एम्ब्रोयडरी करून नॅपकिन बुकेमध्ये वापरले जातात, असं निलेश खोले यांनी सांगितलंय.