कोल्हापूर- गेल्या काही दिवसांपासून मटण दरवाढीवरून अनेक तक्रारी येत आहेत. पण, मटणाच्या दरवाढीमागे व्यवसायाच्या पलीकडे जाऊन आमच्या काही अडचणी असल्याचे अजब उत्तर खाटीक समाज संघटनेचे विजय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिले. गेल्या महिन्याभरापासून कोल्हापुरात ५६० रुपये प्रतिकिलो असलेल्या मटणाच्या दरात २० रुपये कमी करत असून ५४० हा आमचा अंतिम दर असणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोल्हापूरपासून ४ किलोमीटरवर असणाऱ्या गावांमध्ये जर ४४० रुपये किलो मटण विक्री होत असेल, तर कोल्हापुरात यामध्ये सव्वाशे रुपयांचा फरक का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता खाटीक समाजाचे नेते विजय कांबळे म्हणाले, आमच्या मटणाचा दर्जा आणि इतर ठिकाणचा दर्जा यात फरक आहे. मटणातील शुद्धता हाच आमचा प्रामाणिकपणा आहे. दरम्यान, मटण दरासंदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी एका समितीची नियुक्ती केली आहे. याबाबत विचारले असता कांबळे म्हणाले, मटण दराबाबत नागरी कृती समितीची बैठक झाली. त्यानंतर जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली, त्यामध्ये समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.