महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पवार साहेबांनी सांगूनही सतेज पाटीलांनी निमंत्रण नाकारलं - खासदार महाडिक

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाण्याचे निमंत्रण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्याकडून काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना दिले होते. शिवाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगून सुद्धा आमदार पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे निमंत्रण नाकारले, हे मला बरोबर वाटले नाही, असे खासदार धनंजय महाडिक म्हणाले.

By

Published : Apr 1, 2019, 7:28 PM IST

Updated : Apr 1, 2019, 7:38 PM IST

खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर- उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाण्याचे निमंत्रण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्याकडून काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना दिले होते. शिवाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगून सुद्धा आमदार पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे निमंत्रण नाकारले, हे मला बरोबर वाटले नाही, असे खासदार धनंजय महाडिक म्हणाले.

खासदार धनंजय महाडिक

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्यावतीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अत्यंत साधेपणाने शक्तिप्रदर्शन न करता त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील खासदार महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हजेरी लावणार का? याची चर्चा सर्वत्र होती. मात्र, त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवत उपस्थिती लावली नाही.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार महाडिक यांनी 'ईटीव्ही भारत'शी बातचीत केली. ते म्हणाले, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आघाडी धर्म पाळत अर्ज दाखल करताना उपस्थित राहायला हवे होते. शिवाय शरद पवार यांनी सुद्धा त्यांच्याशी याबाबत बातचीत केली होती. तरीही त्यांनी निमंत्रण नाकारले हे मला बरोबर वाटले नाही. आघाडीत असून शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणे हे कितपत योग्य आहे? असा सवाल करत, या सर्वाचा विचार त्यांचे वरिष्ठ नेते घेतील असेही महाडिक म्हणाले.

खासदार महाडिक यांनी विधानसभेच्या निवडणुकीवेळी सतेज पाटील यांच्या विरोधात असलेले भाजपचे उमेदवार आणि त्यांचे बंधू अमल महाडिक यांची मदत केली होती. मग तेव्हा खासदार महाडिक यांना आघाडी धर्माबद्दल का आठवले नाही? असा सवाल सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. यावर बोलताना खासदार महाडिक म्हणाले, आम्ही नेहमी आघाडीसोबतच आहे. विरोध करायचा म्हणून ते काहीही टीका करत आहेत. त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करत, गेल्या पाच वर्षांमध्ये आपण कोल्हापूर मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकास कामे केली असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, त्यांना माणसे ओळखता येतात. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.

Last Updated : Apr 1, 2019, 7:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details