कोल्हापूर -आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर तरुण मतदारांसह अनेकांच्या मनात घर केलेले नूतन खासदार धैर्यशील माने यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा तब्बल एक लाख मतांनी पराभव करत संपूर्ण राज्यासह देशात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विजयानंतर धैर्यशील मानेंचे मोतोश्रीवरून कौतुक झालेच पण त्यांची दखल थेट अमित शाह यांनी सुद्धा घेतली असल्याचे समजते आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर लाखोंच्या संख्येने काढलेल्या किसान मोर्चाने मोदी सरकारला सुद्धा घाम फोडणाऱ्या राजू शेट्टींच्या पराभवाची बातमी समजताच मानेंवर महाराष्ट्रातील नेतेमंडळींकडून कौतुकांचा वर्षाव सुरू झाला आहे. त्यामुळेच आता या युवा नेतृत्वाला थेट मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नूतन खासदार धैर्यशील मानेंचा राजकीय प्रवास सुद्धा अगदी ग्रामपंचायत निवडणुकीपासून सुरू झाला. 2002 मध्ये त्यांनी रुकडी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी जिल्हापरिषदेची निवडणूक सुद्धा लढवली. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे अडीच वर्षे उपाध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवले. या सर्वांच्या माध्यमातून त्यांना जवळपास 15 वर्षांचा राजकीय अनुभव आणि राजकीय वारसा असल्याने गेल्या वर्षभरापूर्वीच त्यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक असून कसल्याही परिस्थिती ही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्याने धैर्यशील मानेंनी आई माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह सेनेमध्ये प्रवेश करत हातकणंगलेमधून तिकीटही मिळवले.