कोल्हापूर- लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावीत, या मागणीसाठी सर्व पक्षीय संघटनेने महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले. शहरातील तारबाई पार्क येथील मुख्य महावितरण कार्यालयाबाहेर पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाली. तसेच वीजबिल माफीचा निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला.
कोल्हापुरात वीजबिल माफीसाठी महावितरण कार्यालयाला टाळे; पोलीस व आंदोलकांत झटापट - तारबाई पार्क, कोल्हापूर
वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी सर्व पक्षीय संघटनेने महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले. पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाली. तसेच वीजबिल माफीचा निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे.
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सामान्य माणसाच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडले आहेत. अशावेळी राज्य शासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे. लॉकडाऊन काळातील 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती वीजग्राहकांची तीन महिन्यांची बिले राज्य शासनाने भरावीत, अशी मागणी इरिगेशन फेडरेशनच्यावतीने राज्य शासनाकडे केली आहे.
शेजारील केरळ, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांनी लॉकडाऊन काळातील घरगुती वीजबिलांमध्ये सवलत दिलेली आहे. महाराष्ट्रातही वीज बिलात सवलत देण्याचे आश्वासन उर्जामंत्र्यांनी दिले होते. पण त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. शासनाने त्याची अंमलबजावणी केली नसल्यामुळे काही संघटनांनी एकत्र येत ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयाला टाळे ठोकले. यात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कोल्हापूर सर्व नागरी कृती समिती यांचा समावेश होता. घटनास्थळी आंदोलनकर्त्यांना प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली.