कोल्हापूर - फास्टटॅग अनिवार्य करूनही जर वाहनधारकांचा टोलनाक्यावर वेळ वाचत नाही, तर मग या फास्टटॅगचा काय उपयोग? असा सवाल मनसे नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी विचारला आहे. मंगळवारी रात्री किनी टोलनाक्यावरून रुपाली पाटील प्रवास करीत होत्या. यावेळी टोलनाक्यावर फास्टटॅगधारक वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल २ तास वाहनधारकांना रांगेत उभे राहावे लागल्याने लोकांची पिळवणूक थांबवा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.
मनसे नेत्या रुपाली पाटलांचा कोल्हापूरच्या किनी टोल नाक्यावर राडा फास्टटॅगमुळे नागरिकांमध्ये संताप-15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून फास्टटॅग अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच ज्या वाहनांना फास्टटॅग नसेल अशा वाहनधारकांकडून दुप्पट टोल आकारला जाणार आहे. मात्र, या फास्टटॅगच्या माध्यमातून टोलनाक्यावरील गर्दी टाळून प्रवाशांचा वेळ वाचविण्याचा मुळ उद्देशच साध्य होताना दिसत नाही. फास्टटॅग स्कॅनिंगच्या तक्रारीमुळे टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागत आहेत. असाच प्रकार कोल्हापूरच्या किनी टोलनाक्यावरही पाहायला मिळाला. मंगळवारी रात्री वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे संतापलेल्या मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी टोल नाक्यावर दंगा घालत रांगेतील सर्व गाड्या सोडण्यास तेथील कर्मचाऱ्यांना भाग पाडले. वाहनधारकांना 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आपण थांबवू शकत नसल्याचे म्हणत नागरिकांना असा त्रास झाला तर मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
टोल नाक्यांवर हँडलींग फास्टटॅग गन ठेवा-प्रत्येक वाहनांच्या काचेवर फास्टटॅग अगदी कोपऱ्यात लावल्याचे पाहायला मिळते. टॅग काचेच्या मधोमध लावलेला नसतो. त्यामुळे नाक्यावरील स्कॅनिंग मशीनमध्ये स्कॅन होण्यास अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे टॅग व्यवस्थित लावला तर स्कॅनिंग लवकर होण्यास मदत होनार आहे. शिवाय ज्या ठिकाणी वाहनधारकांना या अडचणीला सामोरे जावे लागत आहे, त्या ठिकाणी 'हँडलिंग फास्टटॅग गन' ठेवण्यात यावी अशी मागणी होत आहे. राज्यातील काही टोल नाक्यांवर अशा स्कॅनिंग गन ठेवण्यात आल्या आहेत. या आधुनिक फास्टटॅग गनच्या माध्यमातून काही सेकंदात वाहनांवरील फास्टॅग स्कॅन केला जातो. त्यामुळे वाहनधारकांना जास्त वेळ टोल नाक्यावर थांबावे लागत नाही.