कोल्हापूर :MLA Satej Patil : डोक्यावर पाऊस, हलगीचा दणदणाट, कार्यकर्त्यांची साथ आणि फुलांच्या वर्षाव अशा उत्साहाच्या वातावरणात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा (Jan Samvad Padyatra) शनिवारी कोल्हापुरात आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाजपा व युती सरकारवर तीव्र शब्दात टीका केली. तर जाती-जातींमध्ये भांडण लावून भाजपा राजकारण करत आहे, असे म्हणत राज्य सरकार व केंद्र सरकारवर त्यांनी (Satej Patil On BJP) जोरदार टीका केली.
सरकारवर केली जोरदार टीका: दसरा चौकातील सभेत आमदार सतेज पाटील यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सध्याच्या वातावरणात सर्वसामान्यांना सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून काँग्रेसचा आधार वाटतो. स्वातंत्र्यापासून आम्ही जो बंधु भाव जोपासला होता, तो सत्तेत बसलेला पक्ष कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे देशाच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar ) यांनी लिहिलेली घटना आपल्याला वाचवायची असेल तर भविष्यात आपल्याला या पुरोगामी विचारांची भूमिका घेऊन पुढे जावे लागेल.
येणारे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष : कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा आणि शाहू महाराजांचा विचारांचा आहे. येणारे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असणार आहे. आणखी काही फटाकडे वाजवण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने होतील. मात्र आपल्याला दक्ष रहावे लागेल. केंद्र सरकार म्हणत आहे हा अमृतकाळ सुरू आहे. मात्र अमृत हे केवळ दोन लोकांच्या म्हणजे अडाणी आणि अंबानी नशिबी आले आहे. काळ हा 120 कोटी जनतेच्या नशिबी आला आहे. तसेच गेल्या 9 वर्षांत नथुराम गोडसे यांचा उदो उदो करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जात आहे. जुना इतिहास पासून नवीन इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप, सतेज पाटील यांनी केला आहे.