महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 23, 2020, 12:54 PM IST

ETV Bharat / state

आयजीएममध्ये रुग्णांवर तातडीने उपचार; विघ्नसंतोषी लोकांनी बदनामी थांबवावी - प्रकाश आवाडे

आमदार आवाडे यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधितांची विचारपूस करुन माहिती घेतली. यावेळी रुग्णांनी मिळणार्‍या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. त्यामुळे रुग्णालयाची नाहक बदनामी करुन रुग्णांचे मनोबल खचविण्याचा प्रयत्न कदापि खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही आमदार आवाडे यांनी दिला.

ichalkaranji hospital issue  ichalkaranji hospital corona cases  corona update kolhapur  kolhapur corona positive cases  MLA awade visit to igm hospital  आयजीएम रुग्णालय प्रकरण  आयजीएममधील रुग्णांच्या समस्या  आमदार आवाडेंची आयजीएमला भेट
प्रकाश आवाडे

कोल्हापूर - इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात (आयजीएम) कोरोनाबाधितांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांना तातडीने उपचार मिळत असताना असंतोषी मंडळींकडून सोशल मीडियावर रुग्णालयासंदर्भात खोटी माहिती पसरवून नाहक बदनामी केली जात आहे. त्यामध्ये रुग्णालयाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचाच सहभाग असल्याचा सणसणीत आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केला, तर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत त्यांची चांगलीच कानउघडणी केली. तसेच त्यांना हटविण्याचीही मागणी आवाडे यांनी केली.

आयजीएममध्ये रुग्णांवर तातडीने उपचार; विघ्नसंतोषीलोकांनी बदनामी थांबवावी - प्रकाश आवाडे

गेल्या काही दिवसांपासून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय (आयजीएम) संदर्भात सोशल मीडियावरुन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्याची शहानिशा करुन माहिती घेण्यासाठी आमदार आवाडे यांनी अचानकपणे रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करतानाच रुग्णालयात मिळणार्‍या सुविधांबद्दल विचारपूस केली. त्यावेळी रुग्णांनी मिळणार्‍या सेवेबद्दल समाधान व्यक्त करत कसल्याही तक्रारी नसल्याचे सांगितले. यावेळी रुग्णालयात तातडीने गरम पाण्याची व्यवस्था करुन देण्याच्या सूचनाही आमदार आवाडे यांनी केल्या. कोरोना महामारीच्या संकटात आयजीएममध्ये चांगल्या सुविधा दिल्या जात असताना काही दिवसांपासून काही विघ्नसंतोषी रुग्णालयाची नाहक बदनामी करत आहेत. सध्या याठिकाणी आवश्यक खाटांची व्यवस्था असून 30 स्पेशल रुममध्ये ऑक्सिजनसह अतिदक्षता विभागात लागणार्‍या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पण काहीजण रुग्णांचे मनोबल वाढविण्याऐवजी ते खचविण्याचा प्रयत्न करत आहेत. तो प्रयत्न त्यांनी थांबवावा, असे आमदार आवाडे म्हणाले.

संतापलेल्या आवडेंकडून आयजीएमच्या वैद्यकीय अधिक्षकांची कानउघडणी -
वॉर्डमधील अनेक खाटा रिकाम्या असताना नवीन येणार्‍या रुग्णांना खाटा नसल्याचे सांगून परत पाठविले जात असल्याबद्दल आमदार आवाडे यांनी वैद्यकीय अधिक्षकांना जाब विचारला. त्याचबरोबर पूर्वीच्या आयजीएमकडील 42 वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचा स्टाफ सेवेत येण्यास तयार आहे. त्यांचा प्रलंबित प्रश्‍न आपण निश्‍चितपणे मार्गी लावू, असे सांगत त्यांना रुजू करुन घेण्याचे आदेश दिले. परंतु, डॉ. शेट्ये यांनी संबंधित 42 जणांचा स्टाफ भरुन घेण्यास स्पष्टपणे नकार दर्शविला. त्यांच्या या नकारात्मक भूमिकेमुळे संतापलेल्या आमदार आवाडे यांनी शेट्ये यांना धारेवर धरत त्यांची कानउघडणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याशीसुध्दा संपर्क साधून त्यांना संबंधित कर्मचारी व रुग्णालयाच्या परिस्थितीसंदर्भात माहिती देत शेट्ये यांना तेथून तातडीने बदलण्याचीही मागणी आमदार आवाडे यांनी केली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडून संबंधित 42 जणांना सेवेत सामावून घेण्याचे लेखी आदेश रुग्णालयास प्राप्त झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details