कोल्हापूर- एकनाथ खडसे यांना राजकीय जाण तर आहेच पण, ते समजुतदारही आहेत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. पक्षाची हानी होईल अशी कोणतीही कृती ते करणार नाही. खडसे आमचे नेते आहेत ते पक्ष सोडणार नाहीत. त्यांची नाराजी दूर होईल. एक-दोन आठवड्यात सर्व काही सुरळीत होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
'खडसे पक्ष सोडणार नाहीत, त्यांची नाराजी दूर होईल' - एकनाथ खडसे बातमी
एकनाथ खडसे आमचे नेते आहेत. राजकारणात प्रत्येकाची काही ना काही अपेक्षा असते. आपल्याला सन्मान मिळावा अशीही अपेक्षा असू शकते. खडसे यांच्याशी गेल्या पाच वर्षांपासून माझी चर्चा सुरू आहे. एक-दोन आठवड्यात सर्व काही सुरळीत होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नाराजीनाट्य सुरू आहे. घटस्थापनेला खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. सुरुवातीला त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी दिली जाईल. तर नंतर त्यांना कृषी मंत्रीपद देण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, एकनाथ खडसे आमचे नेते आहेत. राजकारणात प्रत्येकाची काही ना काही अपेक्षा असते. आपल्याला सन्मान मिळावा अशीही अपेक्षा असू शकते. खडसे यांच्याशी गेल्या पाच वर्षांपासून माझी चर्चा सुरू आहे. काही वेळा आपल्याला जे अपेक्षित असते असे होतेच असे नाही. पण, खडसे हे अतिशय समजुतदार राजकारणी आहेत. आमच्यासाठी ते नेते आहेत. पक्षाची हानी होईल अशी कोणतीही कृती ते करणार नाहीत. प्रसारमाध्यमातूनच या चर्चा सुरू आहेत. पण, खडसे पक्ष सोडणार नाहीत. त्यांची नाराजी दूर होईल. एक-दोन आठवड्यात सर्व काही सुरळीत होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
मुंबईमधील मेट्रो कारशेड बद्दल आमदार पाटील म्हणाले, पर्यावरण संवर्धनाचे कारण देऊन आरे कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्यात आले. पण, येथेही मिठागरे आहेत. तेथील पाणवनस्पती या कारशेडमुळे नष्ट होणार आहेत. त्याचे काय? मिठागरे भर टाकून बुजवून घेण्यासाठी मोठी रक्कम खर्ची पडणार आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकल्प ठप्प असल्याचे त्याची किंमत आणखी वाढली. 2021 ला जे काम पूर्ण होणार होते. ते आणखी पुढे गेल्याने प्रकल्पाचा खर्च काही हजार कोटींनी वाढणार आहे. शिवाय कांजूरमार्ग येथील जागा न्यायालयीन वादात आहे ती ताब्यात मिळण्यासाठीही बराच काळ जाणार असल्याने आणखी तोटा वाढेल, अशी टीकाही पाटील यांनी यावेळी केली.
हेही वाचा -'...अशाने राज्य चालेल असे वाटत नाही'