कोल्हापूर -महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर अंबाबाई मंदिर तसेच जुन्या राजवाड्याबद्दल चुकीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. जुना राजवाड्यामध्ये शाहू महाराजांचे थडगे आहे, शिवाय अंबाबाईच्या मूर्तीमध्ये हीरक नावाचा धातू मिसळला आहे. ज्याच्यामुळे मूर्तीवर प्राचीन काळापासून प्रकाश फेकला जातो अशी चुकीची माहिती देण्यात आली आहे. आता ही माहिती वेबसाइटवरून तात्काळ हटविण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या kolhapur.gov.in या वेबसाईटवर कोल्हापूर जिल्ह्याची महत्त्वाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे आणि ठिकाणांची सविस्तर माहितीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र यामधील काही माहिती चुकीची प्रसिद्ध करण्यात आली आहे. पन्हाळा गडासंदर्भात सुद्धा या वेबसाईटवर अनेक चुकीचे संदर्भ देण्यात आले आहेत. सर्वात गंभीर चूक म्हणजे यामध्ये कोल्हापूरातील जुना राजवड्यामध्ये शाहू महाराजांचे थडगे आहे अशी माहिती देण्यात आली आहे. खरंतर जुना राजवाड्यामध्ये छत्रपती घराण्याचे आता देवघर आहे. याच ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे या ठिकाणाला खूप मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. असे असताना या ठिकाणाबाबत शासनाच्या वेबसाईटवर चुकीची माहिती देणे म्हणजे खूप मोठी गंभीर चूक आहे. जुना राजवाड्याबरोबरच लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिराबाबत सुद्धा या वेबसाईटवर चुकीची माहिती देण्यात आली आहे. अंबाबाईची मूर्ती हिरक धातूपासून बनविण्यात आली आहे. ज्याच्यामुळे मूर्तीवर प्राचीन काळापासून प्रकाश फेकला जातो. मूर्तीच्या डाव्या हातात तलवार आहे असाही चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे.
वेबसाईटवरून माहिती हटवण्याची मागणी