महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासगी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवा : गृहराज्यमंत्री देसाई

खासगी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज दिल्या. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या गृहराज्यमंत्री देसाई यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था संदर्भातील आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Oct 23, 2020, 10:13 PM IST

कोल्हापूर- खासगी अवैध सावकारीमुळे अडलेल्या शेतकरी वर्गाची कुंचबना होत असते. यासाठी पोलीस विभागाने खासगी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज दिल्या. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या गृहराज्यमंत्री देसाई यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था संदर्भातील आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक धीरजकुमार, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, जयश्री गायकवाड, उपअधीक्षक प्रशांत अमृतकर यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, यावर्षी कोरोना, महापूर आणि नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन खासगी अवैध सावकारांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी पोलीस विभागाने जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवावी. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना देसाई यांनी दिल्या. ते पुढे म्हणाले, दिशा कायद्यासाठी राज्य शासन संवेदनशील आहे.

हेही वाचा -'नाथाभाऊंचे समाधान होण्यासाठी लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात ते पाहू..'

महिलांना सार्वत्रिक ठिकाणी वावरताना सुरक्षित वाटले पाहिजे, असे वातावरण निर्माण करावे असे म्हणत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आणि गुन्ह्यांचे उकल होण्याच्या वाढत्या प्रमाणाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवाय पोलिसांना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगत पोलिसांना चांगली वाहने मिळावीत, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व पोलीस विभागाकडील कामकाजाबाबत सविस्तर संगणकीय सादरीकरण केले.

ABOUT THE AUTHOR

...view details