कोल्हापूर - ऐन दिवाळीत कोल्हापूर जिल्ह्याचा जवान शहीद झाल्यानं संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. असे असताना मात्र आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी एका खासगी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यामुळे यड्रावकर यांना शहीद जवानाचा विसर पडला का? असा सवाल उपस्थित होतोय. राजेंद्र पाटील-यड्रावकर कोल्हापूर जिल्ह्याचे असून शिरोळ मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. अशात राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी खाजगी कार्यक्रमाला जाण्या पेक्षा शहीद जवानाच्या कुटूंबियांचे सांत्वन करणे आवश्यक होते अशी चर्चा आहे.
आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील तरुण वयाच्या २० व्या वर्षी पाकच्या भ्याड हल्ल्यात शहीद झाला. काल शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे पार्थिव मूळगावी आणल्यानंतर त्यांच्यावर भैरवनाथ हायस्कुलच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिक जोंधळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिले होते. तर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसनमुश्रीफ, जिल्हाधिकारी दौलत देसाई, खासदार संजय मंडलिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, संजयबाबा घाटगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
एकीकडे जिल्ह्यातील शहीद जवानावर अंत्यसंस्कार सुरू असताना दुसरीकडे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर मात्र खासगी कार्यक्रमांना उपस्थित राहिले होते. त्यामुळे राज्यमंत्री यड्रावकर यांना शहिदाचा विसर पडला का? अशी चर्चा स्थानिकांमध्ये होती. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले- पोर्ले याठिकाणी एका पेट्रोल पंपाच्या कार्यक्रमाला यड्रावकर उपस्थित होते.
पाकिस्तानने उरी सेक्टरमध्ये केले होते शस्त्रसंधीचे उल्लंघन