कोल्हापूर -हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. शिवाय बहिरेवाडी गावाचा आम्हा देशवासियांना सार्थ अभिमान आहे. कारण हे गाव म्हणजे वीर जवानांच्या रत्नांची खाणच आहे, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापुरातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील ऋषिकेश डोंगळे यांना वीरमरण आले. त्यांच्या हौतात्म्याची माहिती समजताच मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोंधळे कुटुंबीयांची भेट घेतली. आज (शनिवारी) मुश्रीफ यांनी वीरमरण आलेल्या जोंधळे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने जोंधळे कुटुंबीयांसाठी तीन लाखांचे अर्थसहाय्य सुद्धा मुश्रीफ यांनी यावेळी जाहीर केले.
मोदींनी एकदाच काय तो सोक्ष मोक्ष लावावा; आम्ही पाठीशी
पाकिस्तान आणि चीनकडून भारताबाबत वारंवार आगळीक होत आहे. पाकिस्तानच्या याच भ्याड हल्ल्यात काल जवानांना वीरमरण आले. यामध्ये कोल्हापूरच्या सुपुत्राचासुद्धा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा. त्यासाठी संपूर्ण भारत देश त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले.