कोल्हापूर- जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांना मोठे केले. असे असताना 'ते' विविध वक्तव्य करुन राजकारण करत आहेत. कोल्हापूरची जनता कोरोनाच्या काळात मेली का जगली, हे पाहायला सुद्धा 'ते' कोल्हापुरात आले नाहीत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी डॉक्टर असोसिएशनकडून अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना 5000 फेस शील्ड वाटण्याचा कार्यक्रम पार पडला, यानंतर मंत्री हसन मुश्रीफ माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी आणि भाजपचे राजकारण वेगळे आहे. त्यामुळे खडसेंना का डावलले ? हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. पण कोल्हापूरचा महापौर तीन-तीन महिन्याला बदला जातो, असे बोलून 'त्यांनी' कोल्हापूरच्या जनतेचा अपमान केल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला.
सत्तेच्या काळात पाटील कोल्हापुरात लोकांना लक्ष्मी दर्शन देत होते. मात्र सध्या लक्ष्मीची गरज गरीब जनतेला आहे, मात्र, ते कोल्हापुरात नाहीत. त्यांना कोल्हापूरला येण्यास बंदी नाही, त्यांनी यावे आणि आमचे काम पाहावे, असा टोला सुद्धा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.
भाजप देशात सत्तेवर आहे, पण कोल्हापुरात त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. खरंतर त्यांना कधीच मनावर घेत नाही, कारण ते काहीपण बोलत असतात. शिवाय ते नेहमी भूकंप होणार असल्याची भाषा करतात. सध्या त्यांच्या पक्षावरच भूकंप झाला असल्याची घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.