कोल्हापूर - राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी चार दिवसांपूर्वी सांगली येथे झालेल्या परिवार संवाद मेळाव्यात केलेल्या वक्तव्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल कोल्हापूरातील संकल्प सभेत समर्थन केले. शिवाय त्यांनी आपल्या अनोख्या शैलीत कोणत्याही धर्माला विरोध केला नसल्याचे म्हटले. ते म्हणाले, ज्या पद्धतीने चर्मकार समाजाचा चप्पल बनविणे हा त्यांचा धर्म नसून धंदा आहे, सुतार बांधवांचा सुद्धा सुतारकाम धर्म नसून धंदा आहे. त्याच पद्धतीने पूजा-अर्चा करणे हा सुद्धा पुरोहित समाजाचा धंदा आहे धर्म नाही.
आम्हाला सुद्धा शिकू द्या -ब्राह्मण समाजाला उद्देशून बोलताना छगन भुजबळ म्हणाले, पूजा अर्चा करणे हा तुमचा धंदा आहे धर्म नाही. जर हा धर्म असता तर त्र्यंबकेश्वर येथे स्थानिक ब्राम्हण आणि उत्तर प्रदेशातील ब्राह्मणांमध्ये राडा झाला नसता. तो तुमचा धंदा आहे म्हणून घडले. त्यामुळे आपल्याला हात जोडून विनंती आहे. तुम्ही चप्पलांच्या कारखान्यात सुद्धा शिरला आहात, सोने चांदीच्या व्यावसायिकांच्या पोटावर सुद्धा पाय आणला आहात. मग देवळात तुमचेच 100 टक्के आरक्षण का?, पुण्यातील वेदभवनात केवळ ब्राम्हणांनाच प्रवेश का? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे आम्हाला सुद्धा तुमच्या धंद्यात प्रवेश मिळून शिकू द्या, असेही ते म्हणाले. शिवाय आम्ही सुद्धा मिटकरी यांच्यासारखे समर्पयामी म्हणू. मिटकरी बोलल्यावर रागवायचे काय कारण आहे, असेही भुजबळ म्हणाले.