कोल्हापुरात कोरोनाचा धोका कायम तरीही व्यापारी व्यवसाय सुरू ठेवण्यावर ठाम - कोल्हापूर जिल्ह्यातील नियम व निर्बंध
कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर राज्यात सर्वाधिक आहे. शिवाय जिल्ह्यात डेल्टा प्लसचा धोकाही वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, निर्बंधास व्यापाऱ्यांचा विरोध असून दोन दिवसांनंतर व्यवसाय सुरू करण्यावर व्यापारी ठाम आहेत.
कोल्हापूर
By
Published : Jun 29, 2021, 5:19 PM IST
कोल्हापूर -जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर राज्यात सर्वाधिक आहे. सध्या आरटीपीसीआर चाचण्यांचा पॉझिटिव्हीटी दर 10 टक्क्यांहून अधिक आहे. शिवाय जिल्ह्याला नव्या डेल्टा प्लसचा धोकाही वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून (दि. 28 जून) महाराष्ट्रातील विविध ठिकाणी निर्बंध कायम ठेवले आहेत. असे असताना कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी मात्र निर्बंधांना विरोध केला आहे. प्रशासनाने आवाहन केल्यानंतर व्यापारी शांत झाले असले तरी प्रशासनाला दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. मात्र, दोन दिवसानंतर व्यवसाय सुरू करण्यावर व्यापारी ठाम आहेत.
शासनाकडून कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध कायम
एकीकडे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असतानाच आता डेल्टा प्लस या नवीन व्हेरिएंटचे रुग्णही वाढू लागले आहेत. एकट्या महाराष्ट्रात जवळपास 22 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या डेल्टा प्लसचा धोका पाहता राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यासाठी सरकारने नवीन नियमावलीही जाहीर केली असून अनेक जिल्ह्यात पूर्वीचेच निर्बंध कायम केले आहेत. कोल्हापुरातही प्रशासनाकडून चौथ्या स्तराचे नियम कायम केले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता इतर कोणतेही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी नसणार आहे. अत्यावश्यक सेवेची दुकानेही सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेमध्ये सुरू असणार आहे.
व्यापाऱ्यांचा विरोध, दुकाने सुरू करण्यावर ठाम; प्रशासनाला दिला दोन दिवसांचा अवधी
कोरोनाचा धोका असतानाही कोल्हापुरातील व्यापारी मात्र आता आपले व्यवसाय सुरू करण्यावर ठाम आहेत. याबाबत चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या बातचीत केल्यानंतर ते म्हणाले, गेल्यावर्षीही टाळेबंदीमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेक जण कर्जबाजारी झाले तर अनेक व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याची उदाहरणे आहेत. आजपर्यंत व्यापारी वर्गाने खूप चांगल्या पद्धतीने प्रशासनाला सहकार्य केले आहे, शासनाचे सर्व नियम पाळले आहेत. मात्र, आता व्यापाऱ्यांचा संयम सुटला असून पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने कोणत्याही परिस्थितीत व्यवसाय सुरू करण्यावर ठाम आहे. दरम्यान, सोमवारी प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडले. शेवटी पोलीस प्रशासनाने व्यापाऱ्यांची समजूत काढली. त्यानुसार व्यापारी दोन दिवस आपले व्यवसाय बंद ठेवतील. मात्र, दोन दिवसानंतर काही झाल तरी व्यवसाय सुरू करणारच, या भूमिकेवर आले आहेत.
जिल्हाधिकारी पाठवणार राज्य सरकारला प्रस्ताव
कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी संघटनांनी दुकान सुरू ठेवण्याची परवानगी मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. व्यापारी संघटनेच्या मागणीच्या या प्रस्तावावर राज्य शासन स्तरावर निर्णय घेण्यासाठी हा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवण्यात येईल, असा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (28 जून) झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, व्यापार्यांनी दुकाने सुरू करण्याबाबत निवेदन दिले असले तरी सध्या राज्य शासनाने घालून दिलेले सर्व नियम जिल्ह्यांना लागू आहेत. शिवाय या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाईही करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात अजूनही कोरोनाचा धोका अधिक आहे. त्यामुळे कोणीही प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येवर एक नजर
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वात उशिरा कोरोनाची दुसरी लाट आली. सद्यस्थितीत एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 54 हजार 332 वर पोहोचली आहे. त्यातील 1 लाख 37 हजार 673 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आत्तापर्यंत 4 हजार 683 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 976 वर पोहोचली आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या खालीलप्रमाणे
वयोगट
रुग्णसंख्या
1 वर्षाखालील
272
1 ते 10 वर्ष
5 हजार 695
11 ते 20 वर्ष
12 हजार 285
21 ते 50 वर्ष
88 हजार 751
51 ते 70 वर्ष
37 हजार 605
71 वर्षांवरील
9 हजार 724
एकूण
1 लाख 54 हजार 332
तालुकानिहाय रुग्णसंख्या खालीलप्रमाणे
तालुका, इतर
रुग्णसंख्या
आजरा
3 हजार 770
भुदरगड
4 हजार 188
चंदगड
3 हजार 344
गडहिंग्लज
5 हजार 541
गगनबावडा
632
हातकणंगले
16 हजार 988
कागल
5 हजार 126
करवीर
22 हजार 131
पन्हाळा
7 हजार 775
राधानगरी
3 हजार 424
शाहूवाडी
3 हजार 524
शिरोळ
9 हजार 406
नगरपालिका कार्यक्षेत्रातील
17 हजार 426
कोल्हापूर महानगरपालिका
42 हजार 876
इतर जिल्ह्यातील, राज्यातील
8 हजार 191
कोल्हापुरातील लसीकरण परिस्थितीवर एक नजर
कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थिती 9 लाख 92 हजार 510 जणांनी पहिला डोस घेतला आहे. त्यामध्ये आरोग्य विभागातील 43 हजार 749 जणांचा समावेश आहे. 79 हजार 560 फ्रंटलाईन वर्कर, 18 ते 45 वर्षांतील 17 हजार 810, 45 ते 60 वर्ष वयातील 4 लाख 15 हजार 469 आणि 60 वर्षांवरील 4 लाख 35 हजार 932 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. यातील 2 लाख 86 हजार 588 जणांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता जिल्ह्यात खूप सावकाश गतीने लसीकरण सुरू असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. प्रशासनाने लसीकरणासाठी योग्य नियोजन करून प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे.