कोल्हापूर-ऊस परिषदेत एफआरपी जाहीर झाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटवू नका, अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असा इशारा दिल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. शनिवारी (दि.31 ऑक्टोबर) कारखानदार आणि स्वाभिमानीची बैठक सायंकाळी सहा वाजता शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडणार आहे.
स्वाभिमानी संघटना व कारखानदारांची उद्या बैठक स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २ नोव्हेंबर रोजी ऊस परिषद होणार असल्याची घोषणा केली आहे. या ऊस परिषदेत यंदाची एफआरपी रक्कम जाहीर केल्याशिवाय एकाही कारखान्याने धुराडी पेटवू नये, असा इशारा दिला आहे. त्यावर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी भेट घेतली. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते एफआरपी जाहीर झाल्याशिवाय कारखानदारांनी हंगाम सुरू करू नये, अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल अशी भूमिका पालकमंत्री सतेज पाटील यांच्याजवळ सांगितली. त्यावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्वाभिमानी आणि कारखानदारांची बैठक उद्या घेतली जाईल, असे आश्वासन दिले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावेळी ऊस दराबाबत आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत ऊस दराबाबत निर्णय होत नाही. तोपर्यंत साखर कारखाने सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऊस दराचा प्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता असून यावर तोडगा काढण्यासाठी उद्या तातडीने पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि कारखान्याने तसेच शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहेत. उद्या संध्याकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृहावर ही बैठक होणार असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.