कोल्हापूरMaratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेनं कुच करणार आहेत. त्यामुळं सरकारला काही अवधी मिळाला आहे. जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. यासाठी सध्या तयारी सुरू आहे. मात्र, त्याआधीच मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय, ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत होते.
जरांगेंच्या उपोषणापूर्वीच मिळेल आरक्षण :मराठा आरक्षणासारखा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं 20 जानेवारीला निघणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली होती. त्यानंतर त्यांनी बीडमधील सभेत मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यापूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
'भारत न्याय यात्रा' परिणाम होणार नाही : काँग्रेस नेते राहुल गांधी 14 जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत. याआधी त्यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची केवळ एकाच राज्यात सत्ता आली, असं मुश्रीफ यांनी सांगितलं. काँग्रेसच्या या यात्रेचा जनतेवर काहीही परिणाम होणार नाही, असं देखील मुश्रीफ यांनी म्हटलंय.