कोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. मात्र, आता सर्वच पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारचे राजकारण यात आणू नये. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून हा प्रश्न सोडविला पाहिजे, असे मत काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच, येणाऱ्या काळात दिल्लीमध्ये जाऊन संसदेबाहेर धरणे आंदोलन करण्याची तयारीही सुरू असल्याचे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाने शहरातील शिवाजी चौक येथे लाक्षणिक आंदोलन केले. यात काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील आणि चंद्रकांत जाधव हेही सहभागी झाले होते.
'मराठा आरक्षण प्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज' 'आरक्षणाचा विषय राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या हातात'
मराठा आरक्षणाचा विषय आता देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांनीच आता यात मार्ग काढण्याची गरज आहे. सध्या मराठा बांधव संयमाने आंदोलन करत आहेत. मात्र, समाज शांत आहे, म्हणजे आम्हाला आरक्षण नको असा अर्थ नाही. सध्या खासदार संभाजीराजे राज्यातील सर्वच महत्वाच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे या सर्वांनीच मिळून पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे जाऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागणी केली पाहिजे, असेही आमदार पाटील म्हणाले. परंतु, या प्रयत्नातही हा प्रश्न सुटला नाही, तर 'चलो दिल्ली'चा नारा देऊन आम्ही संसदेच्या बाहेर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, कोल्हापूरमध्ये आजच्या या आंदोलनात सर्वच पक्ष, संघटनेच्या नेत्यांसह मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा -संभाजीराजेंच्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात दोन दिवसाचे अधिवेशन जाहीर करा - चंद्रकांत पाटील