कोल्हापूरMaratha Reservation:मराठा आरक्षण केवळ केंद्र सरकारच देऊ शकत. यासाठी राज्य सरकारनं पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली पाहिजे. तसंच मोदी यांना राज्य सरकारनं विषय समजावून सांगितला पाहिजे. घटनादुरुस्ती झाल्याशिवाय हा विषय सुटणार नाही, असं मत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केलंय. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
आरक्षण फक्त मोदीच देऊ शकतात :सध्या राज्यात मराठा आरक्षणचा मुद्दा तापला असून राज्यभर आंदोलने सुरू आहेत. जालना येथील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनीही सरकरानं निर्णय न घेतल्यास पुन्हा उपोषण सरु करण्याचा इशारा दिलाय. यासंदर्भात आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज शाहू महाराज छत्रपती यांनी आता आपलं मत व्यक्त केलंय. आरक्षणाचा प्रश्न राज्यापेक्षा दिल्लीत सोडवला पाहिजे. केंद्रात, राज्यात सध्या भाजपाची सत्ता आहे. यामुळं हा प्रश्न सुटू शकतो. तसंच हा प्रश्न केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकारच सोडवू शकतात असा दावा त्यांनी केलाय.
50% आरक्षणाची मर्यादा वाढवा :राज्य सरकारनं पंतप्रधानांना विषय समजावून सांगून हा विषय संपवला पाहिजे. केंद्रात सध्या त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यांच्याकडे ताकद आहे, त्यामुळं ते घटनादुरुस्ती करून निर्णय घेऊ शकतात, असं देखील शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटलंय. 50% आरक्षणाची मर्यादा वाढवल्यास ओबीसी, मराठा आरक्षणाचा वाद राहणार नाही. तसंच सध्या तरी केंद्रात, राज्यात एकच सरकार आहे. पुढे एक वर्षानंतर निवडणुका झाल्यानंतर काय होईल हे सांगता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय.