कोल्हापूर - मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कोणत्या प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेश मिळणार, कोणत्या प्रवर्गातून नोकरी मिळणार, हे राज्य सरकारने मंगळवारी ५ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करावे. तसच एमपीएससी परीक्षा रद्द करावी. अन्यथा राज्यातील मराठा समाजातील स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी, समन्वयक मुख्यमंत्री उठव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर आंदोलन करेल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबा पाटील यांनी कोल्हापुरात दिला. तर, एमपीएससी परीक्षा घेतल्यास परीक्षा केंद्र फोडण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे.
मंगळवारी मातोश्रीवर धडकणार मराठा समाज, एमपीएससी परीक्षा घेतल्यास केंद्र फोडण्याचा इशारा
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. मात्र, अद्याप निर्णय घेतलेला नाही, मुख्यमंत्र्यानी बाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. त्यांनी मंगळवारपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा मातोश्रीसमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला.
बीडमधील मराठा समाजातील तरुणाची आत्महत्या, ही केवळ एकट्या विवेकाची नाही. संपूर्ण मराठा समाजाची आहे. आरक्षण स्थगितीमुळे विद्यार्थ्यांचा नुकसान होत असल्याने तरुणांनी ही भूमिका घेतली. मात्र, तरुणांनो खचून जाऊ नका, असे आवाहन आबा पाटील यांनी केले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता काही मागण्या जाहीर केल्या. पण, एसईबीसी दाखले कसे देणार यासह अन्य संभ्रम सरकारने लवकर दूर करावेत, अशी मागणी आबा पाटील यांनी केली. मराठा आरक्षण स्थगितीनंतर स्पर्धा परीक्षेचा घाट कोण घालत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. मात्र, अद्याप निर्णय घेतलेला नाही, मुख्यमंत्र्यानी बाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. सरकारला पुन्हा एक संधी देऊ, त्यांनी मंगळवारपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा मातोश्रीसमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला.
परीक्षाकेंद्र फोडणार
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यातील हजारो तरुण बेरोजगार होण्याच्या वाटेवर आहेत. अनेक तरुण नोकरी मिळाल्यानंतरही सहा वर्ष घरात आहेत. काही दिवसात महाराष्ट्र राज्य सेवेची परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा रद्द करावी अशी मराठा समाजाची मागणी आहे. राज्य सरकारने ही परीक्षा घेण्याचा प्रयत्न केल्यास मराठा क्रांती ठोक मोर्चा परीक्षाकेंद्र फोडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारादेखील यावेळी सचिन तोडकर यांनी दिला.
आधी आरक्षण मग परीक्षा
अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरतेवेळी मराठा प्रवर्गातून परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. मात्र, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर ही परीक्षा कोणत्या प्रवर्गातून घेतली जाणार आहे. मराठा समाजातील तरुणांचे भविष्य काय, असा सवाल विशाल पाटील यांनी केला. 'आधी आरक्षण मग परीक्षा' अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.
हेही वाचा -7 तारखेपर्यंत वेतन द्या, अन्यथा 9 ऑक्टोबरपासून आंदोलन करु; एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा