कोल्हापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्य सरकारने पुढील महिन्यात होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा, नोकर भरती व राज्यसेवेच्या परीक्षा रद्द कराव्यात, मराठा समाजाला डावलून परीक्षा घेण्याचा प्रयत्न केल्यास हे खपवून घेणार नाही. अन्यथा परीक्षा केंद्रावर जाऊन बंद पाडू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी दिला आहे.
नोकर भरती, वैद्यकीय आणि राज्यसेवेच्या परीक्षा रद्द करा, अन्यथा.. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील पुढे म्हणाले, 'कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. अशा काळात स्वतः मुख्यमंत्र्यांनी खासगी क्लास, शाळा गरज पडल्यास बंद करण्याचा सूचना प्रशासनाला केल्या आहेत. तसेच आंदोलन, मोर्चा यांना बंदी घातली आहे. मात्र मराठा समाजाला डावलून पुढील महिन्यात वैद्यकीय परीक्षा, नोकर भरती व राज्यसेवेच्या परीक्षा घेण्याचा घाट घालत आहे. तो तत्काळ रद्द करावा. या परीक्षा घेऊ नयेत, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढावा. मराठा समाजाला डावलून परीक्षा घेण्याचा प्रयत्न झाल्यास, तो कदापि सहन केला जाणार नाही.'
परीक्षा रद्द करण्याची मागणी
'चालू-बंद शाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे या होणाऱ्या परीक्षा रद्द कराव्यात, अन्यथा परीक्षा होऊ देणार नाही. राज्यातील प्रत्येक केंद्रावर जाऊन मराठा समाज परीक्षा होऊ देणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. राज्य सरकारने या परीक्षांचा घाट घातल्यास मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल,' असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.