कोल्हापूर - अशोक चव्हाण यांच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण रद्द झाले असल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने सरकारला अल्टिमेटम दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून अधिवेशन बोलवावे, तसेच एमपीएससीमार्फत निवड झालेल्या मुलांची निवड रद्द करण्याच्या हालचाली थांबवाव्या, अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन मंत्रालयात बसणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. शिवाय राज्य सरकार आता मराठा आरक्षणावर पळवाटा काढायचे काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तोपर्यंत कोणतीही भरती होऊ देणार नाही : दिलीप पाटील
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणावर निर्णय होत नाही. तोपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही भरती प्रक्रिया होऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी दिला. शिवाय आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न झाल्यास एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशाराही दिलीप पाटील यांनी दिला.