कोल्हापूर- मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या डॉक्टरच्या रुग्णालयाची मराठा समाजाच्या नेत्यांकडून आज (दि. 26 मे) तोडफोड करण्यात आली आहे. हा प्रकार कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात असणाऱ्या सूर्या रुग्णालय येथे घडला आहे. 'सेव्ह मिरीट सेव्ह नेशन' या संस्थेच्या वतीने आरक्षणातून झालेली भरती रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे संतापले नागरिकांनी संस्थेचे सदस्य असलेले डॉ. तन्मय व्होरा यांच्या रुग्णालयावर हल्लाबोल केला. दरम्यान, डॉ. तन्मय व्होरा यांनी मराठा समाजाची माफी मागत माझा यांच्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
आंदोलनकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजात अस्वस्थता पसरली आहे. तर तरुणांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. असे असताना 'सेव्ह मिरीट सेव्ह नेशन' या संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरक्षणातून झालेली भरती रद्द करावी, असे पत्र पाठवण्यात आले आहे. हे पत्र मराठा समाजाच्या हाती लागले आहे. त्याचे सदस्य असलेले कोल्हापुरातील डॉ. तन्मय व्होरा यांची माहिती घेऊन कोल्हापुरातील मराठा समाजाच्या नेत्यांनी त्यांच्या रुग्णालयासमोर निदर्शन केली. यावेळी व्होरा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काही आंदोलकांनी व्होरा यांच्या रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मोठ-मोठ्याने घोषणाबाजी करत रुग्णालयातील फलकाची तोडफोड केली. यावेळी अचानक झालेल्या प्रकारामुळे कोरोनावर उपचार सुरू असणारे रुग्ण, नातेवाईक, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी पटापट दरवाजे बंद करत स्वतःला कोंडून घेतले. पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना जिन्यातच रोखले. तन्मय व्होराने मराठा समाजाची माफी मागून पत्र मागे घ्यावे, अशी आंदोलकांनी मागणी केली. मात्र, आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.