महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांची पूरस्थिती गंभीर; शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर

सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. सहा ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीकाठी आणि पर्यटनासाठी धबधब्याच्या ठिकाणी कोणी जाऊ नये, अशा सूचना देखील प्रशासनाने केल्या आहेत. या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरला महापुराचा विळखा आणखी घट्ट होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरती वाहत असून जिल्ह्यातील अनेक सखल भागांत आणि नदी काठच्या गावात पुराचे पाणी शिरले आहे.

By

Published : Aug 4, 2019, 7:15 PM IST

Updated : Aug 4, 2019, 10:52 PM IST

कोल्हापूर - जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांची पूरस्थिती आता गंभीर बनली आहे. विशेषतः पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरती वाहत असून जिल्ह्यातील अनेक सखल भागांत आणि नदी काठच्या गावात पुराचे पाणी शिरले आहे. राजाराम बंधाऱ्याची पाण्याची पातळीत सुद्धा झपाट्याने वाढ होत आहे. सद्यस्थितीला बंधाऱ्याची पाणी पातळी 45.6 फुटां पर्यंत पोहचली आहे. रविवारी झालेला मुसळधार पाऊस, धरणांमधून होणारा विसर्ग यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद आहेत. त्यामुळे उद्या सर्व शाळा, प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालये यांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली सुट्टी जाहीर केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात पाणी शिरले असून जिल्ह्यात पुराची स्थिती आणखी गंभीर होण्याच्या मार्गावर आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पुराची स्थिती आणखी गंभीर होण्याच्या मार्गावर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात पाणी शिरले असून यामध्ये कोल्हापूर शहर, नृसिंहवाडी, कुरुंदवाड, दानोळी, इचलकरंजी भागात पुराचे पाणी शिरले आहे. या महापुरामुळे 300 कुटुंबातील 1200 हुन अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली आणि एसटीचे 19 मार्ग पूर्ण बंद झाले आहेत. या सर्व आपत्तीला तोंड देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण प्राधिकरण सज्ज झाले आहे.

कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प; रेल्वे सेवेवरही परिणाम

राधानगरी धरणाचे 4 दरवाजे अद्यापही उघडेच असून धरणातून प्रतिसेकंद 7121 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे. कोवाड, बाजार भोगाव, हळदी बाजारपेठेत जवळपास 4 फुटांपेक्षा अधिक पाणी शिरले आहे. गेल्या 48 तासांपासून कोल्हापूर-राधनागरी, कोल्हापूर- गगनबावडा, कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद असून कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस उशिरा धावत आहे तर हरिप्रिय एक्सप्रेस आज मिरजेतच थांबणार आहे.

गावांचे झाले बेट

महापुरामुळे गोकुळच्या 43 हजार लिटर दुधाची घट झाली असून कोल्हापूर शेजारी असणाऱ्या आंबेवाडी आणि चिखली गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. राधानगरी, गगनबावड परिसरात अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळत आहे. यामुळे पंचगंगा धोक्याच्या पातळीवर वाहत असून तासाला पंचगंगेची पाणी पातळी वाढत आहे. जिल्ह्यात अनेक घरांची पडझड झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

जिल्ह्यात सहा ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा ईशारा

सध्या पावसाचा जोर कायम असून सहा ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीकाठी आणि पर्यटनासाठी धबधब्याच्या ठिकाणी कोणी जाऊ नये, अशा सूचना देखील प्रशासनाने केल्या आहेत. या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरला महापुराचा विळखा आणखी घट्ट होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरातील प्रमुख भागांमध्ये देखील पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वत्र 2005 ची पुनरावृत्ती होणार का, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : Aug 4, 2019, 10:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details