माणगांवचे सरपंच राजू मगदूम सत्कार समारंभात बोलताना कोल्हापूर : जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगांव गावचे सरपंच राजू मगदूम नेहमी गावामध्ये विविध नाविन्यपूर्ण निर्णय तसेच घोषणा करून चर्चेत असतात. माझ्या शिल्लक असलेल्या 3 वर्षांच्या कार्यकाळात गावातील इतर ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा सरपंच-उपसरपंच पदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी देणार असल्याची त्यांनी त्यांच्या नागरी सत्कारात घोषणा केली आहे.
सर्वांना संधी देण्याचा मानस : लोकं एखादे पद मिळावे आणि ते दीर्घकाळ राहावे यासाठी खूप काही करताना पाहायला मिळते. पण आपल्याच नागरी सत्कारामध्ये स्वतःच्या राजीनाम्याची घोषणा करून आपल्या सहकारी सदस्यांना सुद्धा सरपंच तसेच उपसरपंच पदाची जबाबदारी देणार असल्याचे या सरपंचांनी जाहीर केले आहे. राजू मगदूम हे गेल्या अनेक वर्षांपासून हातकणंगले तालुक्यातील माणगांव गावचे सरपंच असून त्यांनी गावात राबवलेल्या विविध योजनांमुळे त्यांची जिल्हाभर एक वेगळी ओळख आहे.
सत्कार समारंभात घोषणा : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी व आदिनाथ बँकेच्या व्यवस्थापकिय संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मगदूम यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना सरपंच राजू मगदूम यांनी आपल्या सरपंच पदाचाच राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. एव्हढेच काय तर आपल्या ग्रामपंचायतच्या सर्व 17 सदस्यांनी सुद्धा सरपंच उपसरपंच पदाचे काम पाहण्याची संधी मिळावी यासाठी त्यांना सुद्धा उरलेल्या 3 वर्षांच्या कार्यकाळात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हंटले.
म्हणून घेतला निर्णय :राजू मगदूम आयोजित कार्यक्रमाच्या आपल्या भाषणात म्हणाले की, इथून पुढच्या काळामध्ये सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण कधी येईल हे माहिती नाही. राज्य सरकारने लोकनियुक्त सरपंच निवडण्याच्या कायद्यात बदल केल्याने सर्वांना सरपंच होता येणार नाही. त्यामुळे मला माझ्यासोबत काम करणाऱ्या व गावच्या विकास कामात योगदान देणाऱ्या सर्व सदस्यांना सरपंच करण्याचा माझा मानस आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात मी माझ्या सरपंच पदाचा राजीनामा देणार आहे. यासाठी सर्व ज्येष्ठ नेतेमंडळींनी मला परवानगी द्यावी, अशी मागणी राजू मगदूम यांनी केली. माणगाव ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या 17 ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच व उपसरपंच होण्याचा मान येणाऱ्या तीन वर्षांमध्ये आपण सर्वांनी मिळून देत व एक नवा आदर्श राज्याला देऊयात, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut : 'सकाळी उठून भोंगा वाजवण्यापेक्षा....'