कोल्हापूर Ram Mandir Ayodhya :अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला होत आहे. या निमित्तानं देशभरातील रामभक्तांसाठी ही अनोखी पर्वणी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील हुपरी येथील पाटील दाम्पत्यांनी प्रभू श्रीरामाप्रती निस्सीम भक्तीचं दर्शन घडवून सर्वांना अचंबित केलं आहे. दीपक पाटील यांनी 68 व्या वर्षात सायकल वरून अयोध्यापर्यंत सायकल प्रवास केला आहे. तर त्यांच्या पत्नी आशा पाटील यांनी मंदिराच्या भूमी पूजनापासून आजवर 3 लाख 78 हजार हून अधिक 'जय श्री राम' शब्द वहीत लिहून अनोख्या पद्धतीनं भक्तीचं दर्शन घडवलं आहे. येत्या 22 तारखेच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी 4 लाख लिखित जप पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे.
पाटील दाम्पत्याची रामभक्ती :कोल्हापुरातील चंदेरी नगरी अशी ओळख असलेल्या हुपरीत 68 वर्षीय दीपक पाटील आणि त्यांच्या 62 वर्षीय पत्नी आशा पाटील या कुटुंबीयांसोबत राहतात. घरात वारकरी संप्रदाय असल्यामुळं देवाच्या भक्तीचा छंद आहे. या दाम्पत्यानं अयोध्येतील राम मंदिराचा 5 ऑगस्ट 2020 रोजी पायाभरणीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. तेव्हापासून आपल्याला तिथं प्रत्यक्ष जाणं जमणार नाही. पण माझ्या मनातील रामभक्ती तिथंवर पोहोचावी, यासाठी आशा पाटील यांनी एक वही आणि पेन घेऊन 'जय श्री राम' हे शब्द लिहण्यास सुरुवात केली. घरातील कामातून वेळ काढून रोज तीन ते चार पानावर 1200 ते 1500 शब्द लिहून व्हायचे. मागील अडीच वर्षांपासून त्यांची ही दिनचर्या बनली आहे. यात अपवादात्मक काही काळ आजारपणामुळं खंड पडला. मात्र आतापर्यंत त्यांनी 3 लाख 78 हजार हून अधिक वेळा 'जय श्री राम' लिहून आपल्या निस्सीम रामभक्तीचं दर्शन घडवलं आहे. प्रत्येक वहीच्या पाठीमागं त्यांनी बेरीज करुन शब्दांची संख्या लिहिली आहे. इतकंच काय तर यासाठी त्यांनी चार प्रकारचे पेन वापरले आहेत. येत्या 22 जानेवारीपर्यंत राम मंदिर उद्घाटनापर्यंत 4 लाख 'जय श्री राम'चे लिखित जप पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे.