कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अजत पवार यांनी राज्य मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी कागलमध्ये मोठे शक्ती प्रदर्शन केले. सभेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी येणारी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. राज्यात आगामी निवडणुकीत उच्चांकी मताधिक्याने विजयी होणार असा ठाम विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाडगे यांच्यावरही हल्लाबोल केला.
मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात :राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच मंत्री हसन मुश्रीफ यांचा कागल शहरात कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंत्री हसन मुश्रीफ यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर झालेल्या सभेत बोलताना हसन मुश्रीफ यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार 2019 मध्ये अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी केला. मात्र यावेळी अजित पवारांचा श्रेष्ठींकडून विश्वासघात करण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला. 2017, 2019 मध्ये भाजपला पाठिंबा देण्याबाबत आमच्यात चर्चा झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही याबाबत चर्चा झाली. मात्र पक्षश्रेष्ठींनी याला विरोध केल्याने भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय लांबणीवर पडला. आता कोणत्याही परिस्थितीत अजित पवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे 40 आमदारांनी ठरवल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.