महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महाराष्ट्रातील एकही लोकप्रतिनिधी मराठी भाषिकांना पाठिंबा द्यायला आला नाही' - महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव

बेळगाव, कारवार आणि निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, या मागणीसाठी मूक सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 63 वर्षांपासून संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून येथील नागरिक लढा देत आहेत.

आंदोलनात फलक घेऊन सहभागी झालेली मुलगी

By

Published : Nov 1, 2019, 6:54 PM IST

कोल्हापूर - गेल्या 63 वर्षांपासून आम्ही बेळगावचे रहिवासी आहोत. आम्ही सर्व मराठी भाषिक संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा देत आहोत. या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी या लढ्याला पाठिंबा दिला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील एकही लोकप्रतिनिधी पाठिंबा देत नसल्याची खंत बेळगावमधील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

बेळगावात मूक सायकल रॅलीचे आयोजन


बेळगाव, कारवार आणि निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, या मागणीसाठी मूक सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक राज्याचा आज(शुक्रवार) स्थापना दिवस आहे. कर्नाटकात सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र, बेळगाव, कारवार आणि निपाणीमधील लोक हा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात. 63 वर्षांपासून संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून येथील नागरिक लढा देत आहेत. आजच्या मूक सायकल रॅलीमध्ये महाराष्ट्रातील एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता.

हेही वाचा - रेमो डिसुजाला उच्च न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला


महाराष्ट्रातील नेत्यांकडून आम्हाला प्रतिसाद मिळत नसला तरी बेळगावकर आणि मराठी भाषिक लढा द्यायला कुठेही कमी पडलेले नाहीत. आमच्या 63 वर्षांच्या लढ्याला यश मिळाले नाही. आम्हाला महाराष्ट्रात येण्याची तळमळ आहे. महाराष्ट्र सरकारनेसुद्धा आमच्या मागणीकडे लक्ष देऊन आमच्या लढ्याला पाठिंबा द्यावा, अशी भावना महिला आंदोलकांनी व्यक्त केली.
दरम्यान, शुक्रवारी सकाळपासूनच मोठ्या संख्येने मराठी भाषिक बेळगावमधील या रॅलीत सहभागी झाले होते. लहान मुले आणि महिलांनीदेखील या आंदोलनात काळे कपडे आणि काळ्या पट्ट्या बांधून सहभाग नोंदवला.

ABOUT THE AUTHOR

...view details