कोल्हापूर - 2019प्रमाणेच यंदाही कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसू नये, यासाठी प्रशासन संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. मात्र, पंचगंगा आणि कृष्णेचे पाणी पुढे जाऊन ज्या धरणामध्ये मिळते त्या कर्नाटकातील अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गावरच महापुराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यासाठीच आज (शनिवारी) महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा भेट घेऊन पाण्याच्या नियोजनाबाबत बैठक घेणार आहेत. कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुराची नेमकी काय कारणं आहेत? सद्या प्रशासन कशा पद्धतीने सज्ज आहे? यावर्षी कशा पद्धतीने पाऊस सुरू आहे? याबाबत ईटीव्ही भारतचा हा विशेष आढावा...
अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक -
संभाव्य महापुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने वडनेरे समिती आणि पर्यावरण तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालातून सुचविलेल्या उपायोजनांकडे सरकारने सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. मात्र, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला सर्वाधिक महापुराचा फटका बसण्यामागे एक महत्त्वाचे कारण असलेल्या अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत दोन्ही राज्यात समन्वय असणे गरजेचे आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यामध्ये दोन्ही राज्यांनी पूरनियंत्रणाचे काम समन्वयाने करून दोन्ही राज्यातील होणाऱ्या नुकसानीला कशा पद्धतीने रोखता येईल? याबाबत चर्चा होणार आहे.
2019मध्ये महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक गावांना याचा मोठा फटका बसला आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे ही बैठक महत्त्वपूर्ण अशीच आहे. अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे प्रामुख्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते. त्यामुळे यंदाही कोल्हापूर, सांगलीसह, सातारा, बेळगाव, बागलकोट जिल्ह्यातील जवळपास 500 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 120 गावे तर कोल्हापूर जिल्ह्यातील 130 गावांचा समावेश आहे.
गेल्या 3 दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यात मुसळधार -
गेल्या 3 दिवसांपासून कोल्हापुरसह सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदी आणि सांगलीतील कृष्णा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. सद्या कोल्हापूरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 33.08 फुटांवर आहे तर सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी सुद्धा 24 फुटांवर पोहोचली आहे. अवघ्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढत असल्याने यावर्षीही दोन्ही जिल्ह्यांना संभाव्य महापुराचा धोका आहे. शिवाय राधानगरी, चांदोली, कोयना धरणातूनसुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील प्रशासन संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहेत.