कोल्हापूर Maharashtra Karnataka Border Dispute : बेळगावात पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही 1 नोव्हेंबरला निषेध फेरी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 18 पदाधिकाऱ्यांसह तब्बल दीड हजार मराठी भाषिकांवर मार्केट पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळं कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांची मुस्कटदाबी सुरू असल्याचं बोललं जातंय. बेळगावच्या या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मार्केट पोलिसांनी केले गुन्हे दाखल : बेळगाव, निपाणी, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगाव मधील मराठी भाषिकांचा लढा सुरू आहे. बेळगावसह सीमाभागातील 865 गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावी, या मागणीकडे केंद्राचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 1 नोव्हेंबरला कर्नाटक राज्य स्थापना दिवसानिमित्त कर्नाटकात मराठी भाषेतून काळा दिवस साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही काळादिना निमित्त काळे कपडे परिधान करत निषेध फेरी काढण्यात आली होती. या दिनासाठी व्यापक जनजागृतीही करण्यात आली होती. यामुळं या फेरीला व्यापक प्रतिसाद लाभला. धर्मवीर संभाजी मैदान येथून फेरीला सुरुवात झाली. त्यानंतर मराठा मंदिर येथे जाहीर सभा घेण्यात आली होती. या फेरीत हजारो लोक सहभागी झाले होते. मात्र, या फेरीत संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या व कर्नाटक सार्वभौमत्वाला धक्का पोहोचण्याचा प्रयत्न केला तसंच या फेरीला पोलिसांनी परवानगी नाकारली असताना ही ही रॅली काढण्यात आली असे आरोप करत मार्केट पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे 18 पदाधिकारी आणि तब्बल दीड हजार मराठी भाषिकांवर गुन्हा दाखल केलाय. आता या घटनेचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.