कोल्हापूर Mahaparinirvan Day 2023: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झालं. मुंबईत चैत्यभूमीवर जमललेल्या जनसागराच्या साक्षीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याचवेळी कोल्हापुरातील हुपरी (Hupari village) येथील काही आंबेडकरी अनुयायांनी प्रचंड बंदोबस्त असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी मिळवल्या होत्या.
अस्थी सर्वसामान्यांना दर्शनासाठी खुल्या: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झालं होतं. मुंबईत बाबासाहेबांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी कोल्हापुरातून हुपरीचे सामाजिक कार्यकर्ते भास्कर शिंगे, रामचंद्र कांबळे (रामू भाटे), मारुती कंगने, रतन कांबळे, नामदेव भोगले, गुंडा फुले, कृष्णा कांबळे, सिताराम कांबळे, अलगोंडा कांबळे, शंकर कांबळे (मडिलगेकर) बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी गेले होते. यावेळी चैत्यभूमीवर देशभरातून जमलेल्या जनसमुदायाच्या साक्षीनं डॉ. आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही या आंबेडकर अनुयायांनी बाबासाहेबांच्या अस्थी मिळवल्या आणि त्या हुपरी येथे आणल्या होत्या. तेव्हापासून म्हणजे गेली 67 वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सेवा समितीच्या वतीनं या अस्थींचं जतन केलं जात आहे. 6 डिसेंबर रोजी या अस्थी सर्वसामान्यांना दर्शनासाठी खुल्या केल्या जातात.