कोल्हापूरLover Couple Suicide :एका अल्पवयीन प्रेमीयुगुलानं सोशल मीडियावर स्टेटस ठेवत आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची इथं घडली आहे. हे दोघंही अल्पवयीन असून त्यांच्या प्रेमाला दोघांच्याही घरुन विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोघांनी आत्महत्या करण्यापूर्वी 'ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायलाही तयार व्हा, प्रेम करताना जात, धर्म बघू नका' असं स्टेटस ठेवून आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ( Kolhapur Crime )
प्रियकर आणि प्रेयसी दोघंही अल्पवयीन :हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची इथं राहणाऱ्या तरुणाचं त्याच परिसरातील एका मुलीवर प्रेम होतं. मात्र या प्रेमसंबंधाला दोघांच्याही कुटुंबियांचा विरोध होता. या विरोधाच्या नैराश्यातूनच त्यांनी आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दोघांनीही प्रियकराच्या घरामध्ये आत्महत्या ( Couple Suicide) केल्याचं तरुणाच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आलं. यानंतर दोघांनाही तात्काळ सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच या दोघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
सोशल मीडियावर स्टेटस ठेऊन आत्महत्या :या घटनेतील प्रियकर आणि प्रेयसीनं तरुणाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्टेटस ठेऊन आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या तरुणाच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्टेटस ठेवून या दोघांनी आत्महत्या केली. या स्टेटसवर 'ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायला ही तयार व्हा, प्रेम करताना जात, धर्म बघू नका' अशा आशयाचं स्टेटस ठेवून या दोघांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेनंतर सीपीआर रुग्णालयात दोघांच्याही नातेवाईकांनी गर्दी केली होती. दरम्यान शिरोली पुलाची परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे.
दोघांचेही वडील चांगले मित्र :कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली इथं प्रियकर आणि प्रेयसीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे दोन गटात तणावपूर्ण शांतता आहे. यात प्रियकराचे वडील आणि प्रेयसीचे वडील हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे दोन समजातील असूनही त्यांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. या कौटुंबिक संबंधातूनच या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाल्याची चर्चा गावात सुरू आहे. मात्र त्या दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागल्यानंतर या प्रेमसंबंधांना घरच्या मंडळींनी विरोध केला होता. त्यामुळे हे दोघंही अस्वस्थ होते. याच नैराश्येतून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
हेही वाचा :
- Married Couple Suicide In Kolhapur: प्रेमविवाह केलेल्या नवदाम्पत्याची सात महिन्यात आत्महत्या; घटनेपूर्वी भावाला पाठविले लोकेशन
- Doctor commits suicide in Kolhapur : कोल्हापुरात डॉक्टर तरुणीची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; फुटपाथवर आढळला मृतदेह