कोल्हापूर - प्रेयसीची माफी मागण्यासाठी पुण्यात 'शिवडे आय एम सॉरी' आशयाचे तब्बल 300 फलक लावलेला प्रेमवीर सर्वांना चांगलाच ठाऊक असेल. असाच एक प्रेमवीर कोल्हापुरातील शिरोळ सुद्धा उगवलाय. आपल्या प्रेयसीची आठवण येतेय म्हणून त्याने तब्बल अडीच किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर 'आय मिस यु' आणि 'आय लव्ह यु' लिहलं आहे. मात्र हा प्रेमवीर कोण आहे आणि त्याने कोणासाठी हे लिहलं आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, या प्रेमवीराच्या कारनाम्यानंतर तालुक्यातल्या धरणगुत्ती ग्रामपंचायत प्रशासनाला मात्र चांगलंच काम लागलं असून त्यांनी अडीच किलोमीटरवर लिहिलेले सर्व संदेश ऑइल पेंटने पुसून टाकले आहेत.
प्रेयसीच्या आठवणीत प्रियकराने रस्त्यावर अडीच किलोमीटरपर्यंत लिहिले प्रेमाचे संदेश काय आहे नेमकं प्रकरण - प्रेमात कोणीही काहीही करू शकतं आणि कोणत्याही थराला जाऊ शकतो याची आपण अनेक उदाहरणे पाहिली आहेत. लॉकडाऊन काळात उस्मानाबादमधला प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटायला चक्क पाकिस्तानला चालला होता हे सुद्धा पाहिलंय. कोल्हापूर मधील शिरोळ तालुक्यात सुद्धा अशाच एका प्रियकराने धरणगुत्ती ते जयसिंगपूर मार्गावर तब्बल अडीच किलोमीटरच्या रस्त्यावर ‘आय लव यु’ आणि ‘आय मिस यु’ असे ऑईल पेंटने लिहलं आहे. रात्रीच्या वेळी हे लिहिण्यात आलं असावं. याचे फोटो आता जिल्ह्यात व्हायरल होत असून या प्रेमवीराची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. मात्र हा प्रेमवीर नेमका कोण आहे आणि त्याने कोणासाठी लिहलं हे मात्र अद्याप समजू शकलं नाहीये. मात्र हा जो कोण प्रियकर आहे त्याने हा रस्ता कधी रंगवला याचा कुणाला थांगपत्ता लागलेला नाही. जयसिंगपूर ते धरणगुत्ती हा 6 ते 7 किलोमीटरचा रस्ता आहे. गावाच्या तीन किलोमीटर अलिकडे ‘आय लव यु’ आणि ‘आय मिस यु’ लिखाणाची सुरूवात झाली आहे. तर गाव संपण्याच्या अर्धा किलोमीटर आधी हे लिखाण थांबलं आहे. दरम्यान, प्रेमात बुडालेला प्रियकर कोण आहे याची उत्सुकता पंचक्रोशीसह तालुक्यातील नागरिकांना लागली आहे.
प्रशासनावर ऑईलपेंट पुसण्याची वेळ -
शिरोळ तालुक्यात धरणगुत्ती गावाच्या परिसरात प्रियकराने 'आय मिस यु' आणि आय लव्ह यु असे लिहिले होते. तब्बल अडीच किलोमीटरवर हे लिहिण्यात आले होते. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. याचा धरणगुत्ती ग्रामपंचायत प्रशासनाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. येथील प्रशासनाकडून प्रेमवीराने लिहिलेले संदेश पांढऱ्या ऑइल पेंटद्वारे पुसून टाकण्यात आले आहेत.