महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kolhapur Rajaram High School : कोल्हापूरात जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी भोंगा, संभाजी ब्रिगेडची अनोखी धडपड - राजाराम विद्यालय संभाजी ब्रिगेड अभियान

एकीकडे राज्यासह देशभरात भोंग्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. अनेकजण तर मोफत भोंगे वाटताना सुद्धा पाहायला मिळाले. पुरोगामी कोल्हापूर शहरात मात्र संभाजी ब्रिगेडकडून जिल्हा परिषदेची शाळा वाचविण्यासाठी भोंगा सुरू करण्यात आला आहे. येथील राजाराम हायस्कूल वाचविण्यासाठी त्यांनी ही अनोखी मोहीम सुरू केली आहे.

Kolhapur Rajaram High School
Kolhapur Rajaram High School

By

Published : May 25, 2022, 4:19 PM IST

कोल्हापूर -एकीकडे राज्यासह देशभरात भोंग्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. अनेकजण तर मोफत भोंगे वाटताना सुद्धा पाहायला मिळाले. पुरोगामी कोल्हापूर शहरात मात्र संभाजी ब्रिगेडकडून जिल्हा परिषदेची शाळा वाचविण्यासाठी भोंगा सुरू करण्यात आला आहे. येथील राजाराम हायस्कूल वाचविण्यासाठी त्यांनी ही अनोखी मोहीम सुरू केली आहे. अनेक जण राजकारणात अडकले आहेत. मात्र, जिल्हा परिषदेची शाळा वाचली पाहिजे. यासाठी संभाजी ब्रिगेडने सुरू केलेल्या या धडपडीचे सर्वत्र कौतूक होत आहे. पाहुयात संभाजी ब्रिगेडने नेमकी काय मोहीम सुरू केली आहे.

प्रतिक्रिया

171 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेली शाळा- इ. स. 1851 साली स्थापन झालेली 'मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज' ही करवीर नगरीमध्ये नावाजलेली शाळा आहे. गेल्या 171 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या शिक्षण संस्थेने अनेक कर्तबगार व्यक्तींना घडविले आहे. छावा तसेच मृत्युंजय या कादंबरी ज्यांनी लिहिल्या ते शिवाजी सावंत हे याच शाळेत शिक्षक होते. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एका भव्य ऐतिहासिक इमारतीमध्ये ही शाळा सुरू आहे. पहिली ते बारावीपर्यंत इथे शाळा आहे. शिवाय सद्या सेमी इंग्लिश सुद्धा सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. जिल्हा परिषदेची शाळा असल्याने सर्व शिक्षण मोफत हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. शहरातील सर्व भागातून विद्यार्थी यावेत, यासाठी मोफत बस पास सुद्धा शाळेकडून उपलब्ध करून देण्यात येतो. अद्ययावत शिक्षण तसेच अनुभवी शिक्षण स्टाफ असून सुद्धा या शाळेची पटसंख्या सातत्याने खालावत चालली आहे. त्यामुळेच पूर्वीप्रमाणे मोठ्या संख्येने या ऐतिहासिक वास्तूमध्ये येऊन मुलांनी मोफत आणि चांगल्या दर्जाचे शिक्षण घ्यावे, यासाठी संभाजी ब्रिगेडने गेल्या आठवड्यापासून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

रिक्षा आणि टांग्यावर शाळा वाचविण्यासाठी भोगा -दरम्यान, संभाजी ब्रिगेडने सुरू केलेल्या या मोहिमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इथे शिक्षण घ्यावे याची जनजागृती केली जात आहे. 2000 सालापर्यंत शाळा सुरळीत सुरू होती मात्र शाळेला उतरती कळा लागली. काही वर्गात तर मुलच नाहीत अशी काही वेळा परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पूर्वीप्रमानेच शाळेत मुलं यावीत आणि या ऐतिहासिक वास्तूमध्ये मुलांनी शिक्षण घ्यावे, यासाठी विद्यार्थी आणि पालकांचे प्रबोधन केले जात आहे. टांगा तसेच रिक्षावर भोंगा लाऊन त्याद्वारे संपूर्ण शहरातून याची जनजागृती केली जात आहे. त्यामुळे एकीकडे भोंग्यावरून सुरू असलेल्या राजकारण्यांनी भोंग्यांचा अशा कारणांसाठी सुद्धा कधीतरी उपयोग करावा, अशीच अनेकांची अपेक्षा आहे.

शाहू महाराजांना कृतिशील अभिवादन करण्यासाठी उपक्रम -संभाजी ब्रिगेडचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील म्हणाले, यंदा सर्वजण शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने कृतज्ञता पर्वाचा माध्यमातून राजर्षी शाहू महाराज यांना कृतिशील अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील मेन राजाराम हायस्कूल वाचविण्यासाठी आम्ही मोहीम हाती घेतली आहे. याच शाळेत अनेकजण घडले. त्यामुळे किमान 500 जणांनी या शाळेत प्रवेश घेतल्यास खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचा कृतिशील वारसा आणि विचार आपण पुढे नेऊ, असेही रुपेश पाटील म्हणाले. शिवाय जोपर्यंत शाळेला पूर्वी सारखे वैभव प्राप्त होत नाही, पटसंख्या वाढत नाही, तोपर्यंत संभाजी ब्रिगेड आमची शाळा वाचविण्यासाठीची चळवळ सुरूच ठेवणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे निलेश सुतार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -Kapil Sibal Resigns : कपिल सिब्बल यांचा काँग्रेसचा राजीनामा, सपाच्या पाठिंब्याने राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details