कोल्हापूर - केवळ तीन दिवसात कोल्हापूर जिल्हा जलमय होत असेल तर यावर काहीतरी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. दरवर्षी आपत्ती येत असेल तर लोकांचे जगणेही मुश्कील होणार आहे. त्यासाठी पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे नेण्यासाठी आम्ही यापूर्वीच एक आराखडा दिला होता. त्याला वर्ल्ड बँकेनेही मान्यता दिली होती. मात्र, सरकार बदलले आणि हा प्रश्न तसाच राहिला. जोपर्यंत आपण या पाण्याचा निचरा बोगद्याच्या माध्यमातून पुढे नेऊ शकत नाही तोपर्यंत आंबेवाडी चिखली आणि इतर गावातील पुराचा प्रश्न सुटणार नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवाय याबाबत आता आम्ही पाठपुरावा करू, असे आश्वासनही त्यांनी चिखली आणि आंबेवाडी गावातील पूरग्रस्तांना दिले आहे. यावर्षी सुद्धा कोल्हापुरातील आंबेवाडी आणि चिखली गावांना पुराचा फटका बसला. याबाबत आज (शुक्रवारी) फडणवीस तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी पाहणी केली. शिवाय येथील नागरिकांशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.
'स्थलांतरणासाठी दिलेल्या जागांबाबत ज्या अडचणी आहेत त्याबाबत आवाज उठवू'