कोल्हापूर - राज्यात अनेक जिल्ह्यात नियमांत सवलती दिल्या असल्यातरी कोल्हापूर जिल्ह्यात मात्र 'ब्रेक द चैन' चे नियम १५ जून पर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. जिल्हा अजूनही रेड झोनमध्ये असून रस्त्यावरील गर्दी कायम आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. नियमांत सवलत असणाऱ्या जिल्ह्यात ७ ते २ अशी दुकाने सुरू राहणार आहेत. मात्र, कोल्हापुरात ९ ते ११ या वेळेतच दुकाने सुरू राहणार आहेत. या निर्णयाला विरोध दर्शवत सरसकट दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सने केली आहे.
नियम जैसे थे!, पण कोल्हापुरात नागरिकांची गर्दी कायम 'ब्रेक द चेनचे नियम 15 जूनपर्यंत कायम' -
ब्रेक द चेनचे नियम 15 जूनपर्यंत कोल्हापुरात कायम असले तरी रस्त्यावरील गर्दी कायम आहे. सात ते अकरा या वेळेत नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करत या नियमांना हरताळ फासला आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सामाजिक आंतर, मास्क, याचा फज्जा उडाला असून अशा पद्धतीने गर्दी करत राहिल्यास पुन्हा एकदा कोरोनाचा धोका कोल्हापुरात वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
'सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी द्या' -
महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार ६ एप्रिलपासून अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवसाय बंद आहेत. त्याला ५५ दिवस उलटून गेले आहेत. सर्व व्यापाऱ्यांना लाईट बिल, कर्जाचे हप्ते, घरफाळा, परवाना फी, टेलिफोन बिल, विम्याचे हप्ते, कामगारांचे पगार, शासनाचे सर्व कर हे दुकान बंद असतानाही भरावे लागत आहेत. ते वेळेवर न भरल्यास त्यावर दंड व व्याज लागून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ५५ दिवस दुकाने बंद असल्याने माल खराब होण्याची देखील शक्यता आहे. यामुळे सर्व दुकाने उघडण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केली आहे. शेटे यांनी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले आहे.