कोल्हापूर :जिल्ह्यातीलकोरोनाची स्थिती पाहता उद्या (सोमवार)पासून 31 जुलैपर्यंत कोल्हापुरातील लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. मात्र, या लॉकडाऊनमध्ये काही बाबींना सूट देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सलून वगळता सर्वच दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. शिवाय लग्नकार्य, साखरपुडा आदी कार्यक्रमांना या आदेशात परवानगी नाकारण्यात आली असून अंत्यसंस्कार, अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त 10 जणांना उपस्थित राहता येणार असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये सोमवारपासून निश्चित शिथिलता देण्यात येणार असून त्याबाबतची नियमावली आज(रविवार) जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात 60 वर्षांवरील नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाहीये.
सूट देण्यात आलेल्या बाबी
1) सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशूचिकित्सा सेवा, औषध सेवा, रुग्णालय सेवा देणाऱ्या आस्थापना.
2) सर्व बँक, बँक एटीएम, कॅश रीप्लेनिशिंग एजन्सी (CRA), इन्शुरन्स ऑफिस, वित्त पुरवठा आस्थापना, पोस्ट ऑफिस, पेट्रोल पंप सुरू राहतील.
3) न्यायालये व अत्यावश्यक सेवेतील राज्य व केंद्र सरकारी कार्यालये कमीत कमी अधिकारी/कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुरू राहतील.
4) दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके, यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल/प्रिंट मिडीया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरू राहतील.
5) सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका आणि इतर वैद्यकीय बाबींशी संबंधीत व्यक्तींचा प्रवास व वाहतुकीसाठी परवानगी राहील. त्यासाठी वेगळा पास अथवा परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
6) वृध्द व आजारी व्यक्तीकरिता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुरू राहतील.
7) दूध संकलन व वाहतूक सुरू राहील. यामध्ये वेळेची कोणतीही मर्यादा नाही
8) किरकोळ दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण, भाजीपाला व फळे विक्री सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू राहील.
9) व्यापारी आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 6 वा पर्यंत सुरू राहतील. मात्र आस्थापनेमध्ये केवळ 50 टक्के कर्मचारी घ्यावे लागतील.
10) मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील किराणा-धान्य विक्री व अत्यावश्यक वस्तु विक्री व सेवा सुरू राहतील.
11) एलपीजी गॅस घरपोच वितरण करणाऱ्या आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत.
12) ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या आस्थापना व सेवा सुरू राहतील.
13) दुरध्वनी, इंटरनेट व बँक एटीएम संबंधीत आस्थापना सुरू राहतील
14) शिव भोजन योजना व वंदे भारत योजनेंतर्गत कोविड-19 करिता वापरात असलेले हॉटेल, डॉक्टर्स, स्टाफ, नर्स व संस्थात्मक अलगीकरण/विलगीकरणासाठी घेतलेले हॉटेल, लॉज व इतर इमारती सुरू राहतील. त्याच प्रमाणे ज्या लॉजेस किंवा निवारागृहामध्ये सध्या प्रवासी/कर्मचारी वास्तव्यास आहेत, त्यांचेसाठी अशी लॉजेस व निवारागृहे व त्यातील खाद्यगृहे अशा प्रवाशांपुरत्या मर्यादित स्वरुपात सुरू राहतील.
उद्योगधंदे
1) कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी भागातील सर्व उद्योगधंदे 50% कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आस्थापना 50 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील.
हे बंद राहणार
मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस, रेस्टॉरंट्स, केशकर्तनालये, ब्युटीपार्लर्स, सलून्स, स्पा, मसाज सेंटर, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृहे, बार आणि सभागृहे, असेंब्ली हॉल