कोल्हापूरShankarao Pujari New Urban Cooperative Bank: बँकेकडे पुरेसं भांडवल नाही या कारणास्तव इचलकरंजीतील बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. या बँकेकडं कमाईचं साधन नसल्याचंही कारण देत आरबीआयने इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेन सोमवारी ही कारवाई केली. RBI नं बँकेला काल म्हणजेच 4 डिसेंबर 2023 पासून सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिलेत.
रिझर्व बँकेची कारवाई - कोल्हापुरातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्यात आला असल्याची माहिती रिझर्व बँकेने दिली आहे. रिझर्व बँकेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड, इचलकरंजी कोल्हापूर ही येत्या 4 डिसेंबर 2023 पासून कोणत्याही प्रकारची बँकिंग सेवा देऊ शकत नाही. यासोबतच बँकेत कोणत्याही ठेवी स्वीकारण्यास किंवा पैशाचे व्यवहार करण्यास पूर्णपणे बंदी घालत आहे, असं म्हणण्यात आलं आहे. बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईचं साधन नसल्यानं सध्याची बँकेची असलेली आर्थिक स्थिती पाहता बँक सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही आणि बँकेला बँकिंग सेवा चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक ग्राहकांवर विपरित परिणाम होईल असं पत्रकात म्हटलं आहे.